पुरात अडकलेल्या मुलींच्या मदतीला धावला पुण्याचा बाहूबली
अग्निशमन दलाच्या धाडसाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, तुम्हीही कराल सलाम
पुणे दि १८(प्रतिनिधी)- राज्यात परतीचा पाऊस थांबायचं नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे. राज्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे.पुण्यातही रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसात अनेक नागरिक अडकले होते. मंगळवार पेठेत पावसात अडकलेल्या एका मुलीला खांद्यावर घेऊन येतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुण्यातील मंगळवार पेठेतील स्वरुपवर्धिनी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटुंब पाण्यात अडकले होते. यावेळी स्थानिक पल्लवी जावळे यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना कळवताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठत तेथील तीन लहान मुली, एक महिला आणि एक पुरुष अशा एकाच कुटुंबातील पाच जणांना सुखरुप बाहेर काढले. यावेळी राजाराम तांडेल यांनी लहान मुलींना खांद्यावर घेत बाहेर आणले होते.नेमका हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्यात काल या वर्षातील सर्वाधिक पाऊस झाला त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरण्याबरोबरच अनेकजण पाण्यात अडकले होते.पण अग्निशमन दलाने उत्तम कामगिरी करत अनेकांना सुखरूपपणे वाचवत सुरक्षित स्थळी हलवले आहे.
काल रात्री दहा वाजल्यापासून पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. रात्री दोन वाजेपर्यंत हा पाऊस संततधार पडत होता. त्यामुळे शहरातील अनेक परिसरांना नद्यांचं स्वरुप आलं होतं. अनेकांच्या घरात मध्यरात्री पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. अनेकांना विविध समस्यांना सामोरं जावे लागले आहे. पण राजाराम तांडेल यांचे मात्र काैतुक होत आहे.