
‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ याचा प्रत्यय आज पाटस रेल्वे स्थानकात आला. रेल्वे रुळ ओलांडताना अचानक मालगाडी सुरू झाल्याने एका महिलेवर मृत्यू ओढावला होता. मात्र, अत्यंत घाबरलेल्या अवस्थेतही प्रसंगावधान राखत ही महिला दोन्ही रुळांच्या मध्यभागी झोपली आणि संपूर्ण मालगाडी अंगावरून जाईपर्यंत मृत्यूशी झुंज दिली. सुदैवाने, या थरारक घटनेत महिलेला कोणतीही इजा झाली नाही, मात्र या घटनेने रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकी घटना काय?

शनिवारी (दि. ९) सकाळी पाटस रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. संबंधित महिला प्रवासी रेल्वे रुळ ओलांडून प्लॅटफॉर्मवर जात होती. यावेळी स्थानकात उभी असलेली मालगाडी अचानक सुरू झाली. गाडी सुरू झाल्याचे पाहताच महिलेची गाळण उडाली. मागे फिरणे किंवा पुढे जाणे शक्य नसल्याचे पाहून तिने क्षणाचाही विलंब न लावता दोन्ही रुळांच्या मध्यभागी जमिनीला चिटकून झोपण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण मालगाडी अंगावरून जाईपर्यंत ही महिला जीव मुठीत धरून तिथेच पडून होती. गाडी गेल्यानंतर महिलेचा जीव भांड्यात पडला.

प्रशासकीय उदासीनतेचा फटका
या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आणला आहे. वास्तविक पाहता, पाटस रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी पादचारी मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव जीव धोक्यात घालून रुळांवरूनच ये-जा करावी लागते.
प्रवाशांची आर्त हाक: “आणखी किती बळी घेणार?”
“आज ही महिला बचावली, पण उद्या एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पाटस रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.

