Latest Marathi News
Ganesh J GIF

बावनकुळेंचे ते वक्तव्य आणि नाना भानगिरेंचे मिशन हडपसर धोक्यात

शिंदे गटातील भावी आमदार नेत्यांच्या अडचणी वाढल्या, शिंदे गट भाजपात वादाची ठिणगी

पुणे दि १९(प्रतिनिधी)- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईमध्ये जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत बोलताना विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढवणार तर ४८ जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला देणार असल्याचे वक्तव्य केले आहे. अर्थात नंतर हे वक्तव्य मागे घेण्यात आले पण त्यामुळे शिंदे गटातील काही नेत्यांचे टेंन्शन मात्र वाढले आहे.

बावनकुळे यांनी जागावाटपाचे विधान केल्यानंतर शिंदे गटाने आपण बावनकुळे यांचे विधान गांभीर्याने घेत नसल्याचे जाहीर केले. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही विधानाला कमी समजून चालणार नाही. शिवाय यातून भाजपाने शिंदे गटाला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. पुण्यात देखील भाजपाच्या या वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत. पुण्यात शिवसेनेचे शहराध्यक्ष असलेले नाना भानगिरे आमदार होण्यासाठी उत्सुक आहेत. याआधीही त्यांनी मनसेत जागा आमदारकीची निवडणूक लढवली होती. इतकेच नाही तर २०१९ साली त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र भानगिरे यांचा मतदारसंघ हडपसर आहे. तिथे भाजपाचे योगेश टिळेकर माजी आमदार आहेत. अगदी २०१९ साली पराभवाची शक्यता दिसत असून देखील भाजपाने तो मतदारसंघ आपल्याकडेच ठेवला होता. त्यामुळे २०२४ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत टिळेकर हे पुन्हा तयारीला लागले असून ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पण जर शिवसेनेला फक्त ४८ जागा दिल्यास फक्त विद्यमान आमदारांचा तिकिट मिळणार आहे. त्यामुळे भानगिरे यांचे आमदारकीचे स्वप्न पुन्हा एकदा अधांतरीच राहण्याची शक्यता आहे. हीच स्थिती कोल्हापूर मध्ये राहणार आहे. शिंदे गटात आलेले क्षीरसागर देखील पुन्हा आमदार होणार की माजीच राहणार असा गोंधळ निर्माण झाला आहे. अर्थात भाजपाने नंतर सारवासारव केली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र शिंदे गटाची कोंडी झाली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेतून अपेक्षेप्रमाणे आक्रमक प्रतिक्रिया आल्या आहेत. फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का? असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी बावनकुळेंना लगावला तर संजय गायकवाड यांनी आपण १३० जागा लढवणार असा दावा केला. पण भाजपाच्या मनात काही वेगळेच असल्याचा संदेश या निमित्ताने समोर आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!