Latest Marathi News
Ganesh J GIF

खबरदार! लग्नासाठी धर्म बदलला तर खाल तुरूंगाची हवा

केवळ लग्नासाठी केवळ धर्म बदलणाऱ्यांना चाप, राज्यात कायदा लागू

हरियाना दि २०(प्रतिनिधी)- लव्ह जिहादच्या पार्श्वभूमीवर देशात धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची मागणी जोर धरत असताना हरियाणा सरकारने लग्नासाठी धर्म बदलू शकत नाही, असा कायदाच केला आहे.  हरियाणात धर्मांतर विरोधी कायदा लागू झाला आहे आणि आता राज्यात फक्त लग्नासाठी धर्मांतर करता येणार नाही. या वर्षी मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हरियाणा सरकारने सक्तीचे धर्मांतर रोखण्यासाठी विधेयक मंजूर केले होते. महत्वाचे म्हणजे कायदा मोडल्यास १० वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत एखाद्याने कोणाचेही लालसेने किंवा बळजबरीने धर्मांतर केल्यास त्याला किमान ५ वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर लग्नासाठी धर्म लपवल्यास तीन ते दहा वर्षांचा तुरुंगवास आणि किमान तीन लाख रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. याशिवाय सामूहिक धर्मांतरात नियमांचे उल्लंघन झाल्यास शिक्षेचीही तरतूद आहे. त्याचबरोबर सक्तीचे धर्मांतर करताना पकडले गेल्यास दहा वर्षांची शिक्षा आणि ५ लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. दरम्यान कोणीही स्वतःच्या इच्छेने धर्मांतर करु शकतो, परंतु त्यासाठी त्याने प्रथम दंडाधिकार्‍यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. या कायद्यातील विशेष बाब म्हणजे पीडितेला पोटगीही द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर जर आरोपी व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याची स्थावर मालमत्ता विकली जाईल आणि पीडितेला आर्थिक मदत केली जाईल. त्याचप्रमाणे, धर्मांतरानंतर विवाहितेतून जन्मलेल्या मुलांचीही देखभाल करण्याची जबाबदारी आरोपी व्यक्तीची असेल. सज्ञान होईपर्यंत आरोपीने आर्थिक मदत करणे बंधनकारक असणार आहे.

हरियाणात मागील चार वर्षात जबरदस्तीने धर्मांतराची १२७ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. त्यामुळे लग्नासाठी केवळ धर्म बदलणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी हरियाना सरकारने हे पाऊल उचललं आहे. कायद्याचे उल्लंघन हा दखलपात्र गुन्हा आणि अजामीनपात्र असणार आहे. असा कायदा करण्यात आलेले हरियाणा हे भाजपशासित 11 वे राज्य बनले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!