
पुण्यातील वारजे परिसरातील कथित भोंदू बाबा प्रकरण दिवसेंदिवस अधिकच तापताना दिसत आहे. एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी स्वप्निल लांडे उर्फ ‘गुरुभाई’ याच्यावर आधीच गुन्हा दाखल झालेला असताना, आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. या भोंदू बाबाविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याने त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

नेमके काय आहे नवे प्रकरण?

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (पुणे शहर शाखा) यांनी वारजे-माळवाडी परिसरातील संबंधित व्यक्तीच्या सोशल मीडिया पोस्टचा हवाला देत पोलिसांकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे. तक्रारीनुसार, संबंधित संशयित व्यक्ती स्वतःला “पप्पा महाराज” असे संबोधत असून, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर अलौकिक शक्तींचे दावे करणारे व्हिडिओ प्रसारित करत असल्याचा गंभीर आरोप ‘अंनिस’ने केला आहे.

अघोरी दावे आणि भोंदूपणाचे आरोप
‘अंनिस’ने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत खालील धक्कादायक बाबींचा उल्लेख केला आहे. व्हिडिओंमध्ये “अंगात येणे” आणि थेट उकळता कापूर खाण्यासारखे जीवघेणे प्रकार दाखवणे. अलौकिक शक्तींच्या माध्यमातून लोकांच्या कौटुंबिक व वैयक्तिक समस्या सोडवण्याचे दावे करणे. काही व्हिडिओंमध्ये स्वतःच्या पायाचे धुतलेले दूध भक्तांना प्यायला देण्यासारखे अघोरी प्रकार दाखवणे. या सर्व कृत्यांशी संबंधित व्हिडिओ, फोटो आणि डिजिटल पुरावे पोलिसांना सुपूर्द करण्याची तयारी ‘अंनिस’ने दर्शवली आहे.
जादूटोणाविरोधी कायद्यानुसार कारवाईची मागणी
या प्रकरणात ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम, २०१३’ अंतर्गत कडक कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.
पोलीस प्रशासनाची भूमिका
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर पुणे पोलिसांकडून प्रतिक्रिया आली असून, प्राप्त तक्रारीच्या आधारे सखोल चौकशी केली जाईल आणि चौकशीत जे काही निष्पन्न होईल त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

