वारजे येथील मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या भूमीपूजनासाठी खा. सुळे यांचे केंद्रीय मंत्र्यांना निमंत्रण
बारामती मतदार संघातील गॅस पाईपलाईन, सीएनजी आणि स्वछतेबाबतही सविस्तर चर्चा
दिल्ली दि २१(प्रतिनिधी) – वारजे येथे साडेतीनशे खाटांचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाच्या भूमीपूजनासाठी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदिपसिंग पुरी यांनी यावे, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना केली. याबरोबरच बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक घरात पाइपलाईनद्वारे स्वयंपाकाचा गॅस तसेच सीएनजी स्टेशन्स वाढवणे आणि स्वच्छतेसंदर्भातही त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
पुरी यांची भेट घेऊन सुळे यांनी त्यांना या रुग्णालयाची आणि त्याच्या उपयुक्ततेविषयी त्यांना सविस्तर माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि वारजे भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन दोडके, दिलीप बराटे, सायली वांजळे आणि दिपाली धुमाळ यांनी रुग्णालयासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यास अपेक्षीत यश आले असून रुग्णालय मंजूर झाले आहे. लवकरच याठिकाणी साडेतीनशे खाटांचे रुग्णालाय उभे राहणार आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून पुणे आणि परिसरातील वैद्यकीय सुविधा अधिकाधिक सक्षम होण्यास मदत होणार असून त्याचा या भागातील नागरीकांना मोठा फायदा होणार आहे.
या रुग्णालयाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री पुरी यांच्या हस्ते व्हावे यासाठी सुळे यांनी त्यांची भेट घेऊन तशी विनंती केली. याबरोबरच बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक घरात पाइपलाईनद्वारे गॅस पुरवणे तसेच सीएनजी स्टेशन्स वाढवणे आणि स्वच्छतेसंदर्भातही त्यांनी सविस्तर चर्चा केली.
बारामती लोकसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त घरांना पाईपलाईनने स्वयंपाकाचा गॅस पुरविण्याबाबत यावेळी खासदार सुळे यांनी त्यांच्याशी चर्चा केली. याशिवाय बारामती लोकसभा मतदार संघात अद्याप बऱ्याच ठिकाणी वाहनांसाठी आवश्यक सीएनजी गॅस स्टेशन्स नाहीत. त्यांची संख्या वाढवायला हवी. ही बाब त्यांनी या भेटीदरम्यान हरदीपसिंग पुरी यांच्या लक्षात आणून दिली.
शहराच्या स्वच्छतेबाबतही केंद्रीय मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा झाल्याचे सुळे यांनी यावेळी सांगितले. ही चर्चा सकारात्मक झाली असून आपल्या मतदार संघातील सीएनजी गॅस स्टेशन्स वाढवण्यासाठी आणि स्वयंपाकाचा गॅस जास्तीत जास्त घरांना पाईपद्वारे पुरवण्याबाबत ते नक्किच सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वास खासदार सुळे यांनी व्यक्त केला.