
‘भूमरेसाहेब लय मोठे मंत्री आहेत तीनशे रुपये तरी द्या’
मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आॅडिओ व्हायरल
संभाजीनगर दि १२ (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमधील सभा चांगलीच गाजली. पण या सभेची चर्चा मुख्यमंत्री काय बोलले या पेक्षा सभेला आलेले नागरिक आले होते की आणले होते. या चर्चेने.कारण या सभेला पैसे देऊन लोकांना आणले होते असा आरोप झाल्यानंतर एक आॅडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
मंत्री संदिपान भूमरे यांच्या मतदारसंघात मागच्या वेळी झालेल्या कार्यक्रमात मागील खुर्च्या रिकाम्या होता. तशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत होती. या ऑडिओ क्लिपमध्ये एकजण बोलतो आहे की, “लेडीज म्हणत आहेत की, तीनशे रुपये हजेरी पाहिजे. भूमरेसाहेब लय मोठं मंत्री बनले आहेत. त्यामुळे तीनशे रुपये तरी द्यायला लावा त्यावर दुसरा म्हणत आहे की, ‘भाऊ आपल्या हातात काही नाही. आपण ते मुद्दाम आपल्याकडे पैसे ठेवले नाहीत. पैसे त्यांच्या हातातच ठेविले आहेत.’ त्यावर पहिला म्हणतो की, ‘पैसे तू देणार की ते. तिथं गेल्यानंतर…’ दुसरा म्हणतो आहे की, ‘हे बघ त्यांनी अडीच लाख रुपये पाठविले होते. पण मी म्हटलं की अर्धे खाले आणि अर्धे ठेवले असा विषय होतो. दहा वीस हजारांसाठी आपलं रिलेशन खराब होतं. भूमरेसाहेबांच्या मुलाच्या मेहुण्याकडेच पैसे ठेवले आहेत. ते स्वतःच देणार आहेत. डायरेक्ट अडीचशे अडीचशे रुपये देण्याचं आपलं ठरलं.’ पहिला म्हणतो,‘पैठणला जाण्यासाठी तीनशे तीनशे रुपये द्या. तशी महिलांच्या लीडरचं म्हणणं आहे. त्यावर दुसरा म्हणतो की आपण काहीतरी ॲडजेस्टमेंट करू’ असा संवाद त्यात आहे. मंत्री संदिपान भूमरे आणि त्यांच्या मुलाने ऑडिओ क्लिसंदर्भातील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या मागील कार्यक्रमात अपेक्षित गर्दी झाली नव्हती. त्यामुळे या वेळी भूमरे यांच्याकडून काळजी घेण्यात आली होती. तसेच अंगणवाडी सेविकांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याची चर्चा होती. यामुळे सर्व विरोधकांनी सरकारवर टिका केली आहे. त्यामुळे भुमरेंच्या सभेची राळ राजकारणात उडत राहणार आहे.