मोठी बातमी! अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री
राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप, शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फूट, भाजपाची मोठी खेळी
मुंबई दि २(प्रतिनिधी)- विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीमध्ये गेले काही दिवस नाराज होते.त्याच्यां नाराजीच्या चर्चाणा उधाण आलेले असताना आता अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी देखील फोडण्यात भाजपाला यश आले आहे.
राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार हे शरद पवारांवर नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. अशात आज अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शामील होण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्याकडे २५ आमदारांचा पाठिंबा असणारे पत्र आहे. तर बावनकुळे यांनी अजित पवार यांना ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीतील नऊ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याचा फोटो देखील समोर आला आहे. अजित पवार यांच्यासह धनंजय मुंडे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवाळ, अदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील, धर्मरावबाबा अत्राम यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांनी मात्र यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शरद पवारांचे विश्वासू समजले जाणारे अनेक नेत्यांनी अजित पवारांना साथ दिल्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.
सकाळपासून राज्यात महत्त्वाच्या राजकीय बैठका सुरू होत्या. अजित पवार प्रदेशाध्यक्ष पदासाठी दबाव टाकत असल्याची चर्चा होती. पण आता अजित पवार यांनी थेट सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यात भाजपा सत्तेत राहणार हे स्पष्ट झाले आहे. सुप्रिया सुळे प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांची समजूत काढण्यात अपयशी ठरले आहेत.