मोठी बातमी! जयंत पाटील लवकरच राष्ट्रवादी सोडणार?
पक्षाअंतर्गत राजकारणात जयंत पाटलांची विकेट पडणार, अजित पवारांशी पंग्याने पाटलांची अडचण?
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेली अंतर्गत लढाई संपण्याचे नाव घेत नाही. शरद पवार यांनी राजीनामा दिल्याची घोषणा केलेली तेंव्हापासुन पक्षात असलेली दुफळी समोर आली आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष करूनही पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचा संदेश पुढे येत आहे. त्यातच आता वरिष्ठ नेत्यांमधील वाद उफाळून आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच राष्ट्रवादीला रामराम करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी संघटनेत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अजित पवार यांची नियुक्ती करण्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी केली. त्यामुळे सध्या प्रदेशाध्यक्ष पदावर असलेले जयंत पाटील चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. त्यातच त्यांच्या मागे सुरु असणारा ईडीचा ससेमिरा पाहता जयंत पाटील लवकरच राष्ट्रवादी सोडणार असल्याचा दावा भाजपाने केला आहे. यासाठीची एक दोन नाहीतर चांगली दहा कारणे देखील सांगितली आहे. भाजपाने आपल्या अधिकृत ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत यावर भाष्य केले आहे. शरद पवारांनी जे काही निवृत्ती नाट्य रंगवले होते, त्यामध्ये शरद पवार यांच्या व्यतिरिक्त बेस्ट परफॉर्म केले ते जयंत पाटलांनी… किती रडले होते ते… पण आता जाणवते ते आश्रू खरे होते फक्त कारण वेगळे होते. म्हणूनच जयंत पाटील पक्षातून बाहेर पडणार ? अशी कुजबूज सुरु झाली आहे. अशी सुरुवात करत भाजपाने दहा कारणे दिली आहेत. अजित पवार यांच्याशी असलेले राजकीय वैर, मुलाला आमदार बनवण्याची मनीषा, शरद पवार यांचे दुर्लक्ष आणि राजकीय महत्वाकांक्षा या गोष्टींवर बोट ठेवत भाजपाने जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार असा दावा केला आहे. भाजपने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर राष्ट्रवादीकडून अद्याप कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. पण आगामी काळात या मुद्दयावर राजकारण होण्याची शक्यता आहे.
जयंत पाटील राष्ट्रवादी सोडण्याची प्रमुख १० कारणे. pic.twitter.com/DqedwvkoBf
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 24, 2023
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचे वक्तव्य काही दिवसापुर्वी केले होते. जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. लवकरच ते मार्गक्रमण करतील असा दावा त्यांनी केला होता. पण त्यामुळे, पुन्हा एकदा राष्ट्रवादी आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.