
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) मोठी घोषणा करण्यात आली आहे. या जागेसाठी विदर्भातील ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जैन यांच्या नावावर अंतिम निर्णय झाल्यानंतर, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अधिकृतपणे माध्यमांसमोर त्यांच्या नावाची घोषणा केली. या जागेसाठी आधी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती, मात्र ऐनवेळी पक्षाने राजेंद्र जैन यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजेंद्र जैन यांनी पक्षाचे आभार मानत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“अजितदादांनी दाखवलेला विश्वास सार्थ करणार” – राजेंद्र जैन

उमेदवारी मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना राजेंद्र जैन म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून मी एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षात काम करत आहे. अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली मी यापूर्वी दोन वेळा विधान परिषदेवर निवडून आलो, तर एकदा मला पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय, गोंदिया मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेत मी गेल्या १९ वर्षांपासून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. आता सुनेत्रा वहिनी आणि पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवून ही मोठी जबाबदारी दिली आहे, ती मी पूर्ण ताकदीने खरी करून दाखवेन.ते पुढे म्हणाले की, “विदर्भात पक्षाचे काम अधिक मजबूत करून अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असेन. एका सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिल्याबद्दल मी पक्षनेतृत्वाचा ऋणी आहे.

भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांवर जैन यांचे उत्तर
छगन भुजबळ यांच्या नावाऐवजी आपली निवड झाल्याने पक्षात नाराजी नाट्य रंगणार का? या प्रश्नावर राजेंद्र जैन यांनी अत्यंत संयत आणि स्पष्ट भूमिका मांडली.
छगन भुजबळ हे आमचे वरिष्ठ नेते असून ते माझ्या वडिलांसारखे आहेत. आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नाही. त्यांचा आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे आणि गेल्या १५ वर्षांत त्यांनी मला अनेकदा सांभाळून घेतले आहे. आम्ही सर्वजण एकसंघ आहोत. आमच्या पक्षात कोणावरही अन्याय होत नाही. पक्षासाठी एकनिष्ठेने आणि इमानदारीने काम केल्याचे फळ आज मला मिळाले आहे. सर्व नेत्यांनी मिळून एका सामान्य कार्यकर्त्याला दिलेला आशीर्वाद मी सार्थ ठरवेन.

