दिल्ली दि १(प्रतिनिधी)- एैन दिवाळीत महागाईला तोंड देणाऱ्या नागरिकांना नोव्हेंबरच्या पहिल्याच तारखेला मोठा दिलासा मिळाला आहे.व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. नवीन दर १ नोव्हेंबर २०२२ पासून प्रभावी असतील. यानुसार १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात प्रति सिलेंडर ११५.५० रुपयांनी कपात करण्यात आली आहे. मात्र घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसला तरीही आगामी काळात दर कमी करण्याचे संकेत दिले आहेत.

दिल्लीत १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत आता १७४४ रुपये झाली आहे, जी पूर्वी १८५९.५ रुपये होती. तर मुंबईत १८४४ मध्ये व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध होते, ते आता १६६ रुपयांना मिळणार आहेत. चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता १८९३ रुपये आहे, ज्यासाठी पूर्वी २००९ रुपये मोजावे लागत होते. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत १८४६ रुपये असेल, जी आधी १९९५ रुपये होती.
तर पुण्यात सुधारित दर १७१४ रूपये असणार आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरातील ही सलग सहावी कपात आहे. मात्र, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. ६ जुलैपासून घरगुती सिलेंडरची किंमत स्थिर आहे. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांची कपात होऊ शकते. त्यामुळे या महिन्यात महागाईपासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला 14 किलो घरगुती आणि 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत निश्चित करतात. याआधी ऑक्टोबरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची कपात करण्यात आली होती. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्यातरी व्यावसायिक गॅस दर कमी झाल्यामुळे हॉटेल खाद्यपदार्थ दुकानात खाद्यपदार्थ शिजवण्याचा खर्च कमी होईल, त्यामुळे बाजारात मिळणारे खाद्यपदार्थ स्वस्त होतील.