पुणे दि १(प्रतिनिधी)- पुण्यात आग लागण्याच्या लागोपाठ दोन घटना घडल्या आहेत. सकाळी लुल्लानगरमधील आग आटोक्यात आणल्यानंतर आता पुण्यातील येरवाडा परिसरातील शास्त्री चौकात शिवशाही बसने अचानक पेट घेतला. बस पेटल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवले. परिणामी मोठा अनर्थ टळला आहे.
यवतमाळ ते चिंचवड अशी दीर्घ पल्ल्याची शिवशाही बस येरवडा येथील शास्त्री चौकातून निघाली होती. पण बसमध्ये अचानक काही बिघाड झाल्याचा चालकाला संशय आल्याने त्याने बस रस्त्याच्या डाव्याबाजूला घेत प्रवाशांना खाली उतरविण्यात आले.प्रवाशांना खाली उतरविण्याचे काम सुरु असतानाच बसने अचानक पेट घेतला. धक्कादायक म्हणजे ही घटना घडली तेव्हा बसमधून 42 प्रवासी प्रवास करत होते. सर्व प्रवासी सुखरुप खाली उतरल्याने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. बसला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

भीषण आगीत बसचे मोठे नुकसान झाले आहे. बसला आग लागल्याची घटना अनेकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. एसटी महामंडळ घडलेल्या दुर्घटनेबद्दल तपशील जाणून घेत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.