महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर ‘या’ तारखेला अंतिम निकाल?
नव्या याचिकेमुळे नवीन बाबींचा खुलासा होणार, कोणाची बाजू भक्कम
मुंबई दि १(प्रतिनिधी) एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्भवलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता २९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यातील वकिलांना या प्रकरणाचे संकलन पूर्ण करण्यास आणि चार आठवड्यांच्या आत ठळक मुद्दे तयार करण्यास सांगितले आहेत. त्यामुळे २९ नोव्हेंबरला अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे.

घटनापीठाने शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवला होता, पण आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि सत्तासंघर्षावेळी निर्माण झालेल्या इतर कायदेशीर पेचांबाबत न्यायालयाने कुठलेही निर्देश दिले नव्हते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेण्यापासून आयोगाला रोखावे, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. पण न्यायालयाने ती अमान्य केली होती. पण आता या सत्ता संघर्षाच्या वादात आणखी एका याचिका दाखल झाली आहे. वकील असीम सरोदे यांनी देखील व्होटर इंटरव्हेशन पिटीशन दाखल केली असल्याने आता या प्रकरणात आणखी काही संवैधानिक बाजू पुढे येण्याची शक्यता आहे. आजच्या सुनावणीत युक्तिवादा दरम्यान दोन्ही बाजूंकडून एक सारखेपणा येत होता. तो टाळण्यासाठी कोर्टाने लिखित स्वरूपात बाजू मांडण्याची सूचना केली आहे. ती दोन्ही गटांनी मान्य केली आहे. त्यामुळे आता २९ नोव्हेंबरच्या सुनावणीकडे लक्ष असणार आहे.
मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील इतर महापालिका निवडणुकांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने निकाल द्यायला हवा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने केली आहे.तर आपण शिवसेना सोडलेली नसून आपला गटच खरी शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आपल्याच गटाला मिळावे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने केला आहे.