रेल्वेचे ऑनलाईन तिकीट काढून देत लुबाडणार्या बिहारी टोळीचा पर्दाफाश ; ५ लाख ७७ हजार रुपयांचा माल जप्त
पुणे – दहीहंडी, गणेशोत्सवात बिहारमधून येऊन प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढून देतो, असे सांगून निर्जन स्थळी नेऊन त्यांना मारहाण करुन लुबाडणार्या बिहारी टोळीचा पर्दाफाश फरासखाना पोलिसांनी केला आहे. या बिहारी टोळीमधील १० चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडून ५ लाख ७७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. राजा युनुष पिंकु (वय १९), मोहम्मद सुलतान मोहम्मद तौहिद शेख (वय १८), मुख्य सुत्रधार मुन्ना जोधन साह (वय ४१), राकेश कपलेश्वर पासवान (वय ३२), बिशम्बर मोसफिर दास (वय २५), धमेंद्रकुमार असरफिया (वय २८), जितेंद्रकुमार मोहन सहनी (वय २६), राजेंद्रकुमार सुखदेव महतो (वय २८), दिनेश हरी पासवान (वय २७), पिताम्बर मोसाफिर दास (वय २९, सर्व मुळ रा. बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
त्यांच्या घरझडती व बँगांमधून वेगवेगळ्या कंपनीचे ४१ मोबाईल फोन, १ लाख ४३ हजार रुपयांची रोकड, वेगवेगळ्या लोकांच्या नावावरील ३आधार कार्ड, २ पॅनकार्ड, ९ वेगवेगळ्या लोकांचे एटीएम कार्ड असा ५ लाख ७७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. शिरुर येथे राहणार्या २१ वर्षाच्या तरुणाच्या वडिलांचा अपघात झाल्याने ते मुळ गावी बिहारला जाण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशनला २५ ऑगस्टला आले होते. त्यांना आरोपीने ऑनलाईन तिकीट काढून देतो, असे सांगून डुल्या मारुती मंदिराजवळ आणले. तेथे त्याच्या साथीदारांनी मारहाण करुन मोबाईल फोन, बँकेचे एटीएम कार्ड,आधार कार्ड, पॅन कार्ड काढून घेतले. बँकेचा पासवर्ड जबदस्तीने घेऊन दोन दिवसात या तरुणाच्या खात्यातून ३ लाख ३ हजार रुपये काढून घेतले होते. या गुन्ह्याचा तपास करताना घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.
पोलीस अंमलदार गजानन सोनुने व महेश राठोड यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की अशा प्रकारे गुन्हे करणारे परप्रांतीय पुन्हा गुन्हा करण्याच्या हेतूने डुल्या मारुती मंदिर परिसरात येणार आहे. या बातमीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी डुल्या मारुती मंदिर परिसरात सापळा रचला. यावेळी राजा पिंकु व मोहम्मद शेख या दोघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांचे आणखी ८ साथीदार पुण्यात असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्यांना पकडले. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल , सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक अजित जाधव, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, सहायक पोलीस फौजदार मेहबुब मोकाशी, पोलीस अंमलदार तानाजी नागंरे, नितीन तेलंगे, प्रविण पासलकर, वैभव स्वामी, विशाल शिंदे, महेश राठोड, गजानन सोनुने, नितीन जाधव, संदिप कांबळे, समीर माळवदकर, सुमित खुट्टे, अर्जुन कुडाळकर, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर यांनी केली आहे.