कसबा आणि चिंचवडसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा
या नेत्यांना मिळाली संधी?महाविकास आघाडीतुन 'या' नेत्यांची नावे आघाडीवर
पुणे ४(प्रतिनिधी)- कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची घोषणा केली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना तर चिंचवड विधानसभा पोटणीवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपाने प्रयत्न केले. मात्र, महाविकास आघाडी दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवण्याची चिन्हे दिसू लागल्याने आजअखेर भाजपाने दोन्ही ठिकाणचे पक्षाचे अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत.कसबा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासनेंना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरी तिकीट देण्याचं टाळलं आहे. तर चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. कुणाल टिळक यांची कालच प्रवक्तेपदावर नियुक्ती झाल्याने टिळकांना उमेदवारी मिळणार नाही असे तर्क लढवले जात होते. अखेर आमदार एैवजी टिळकांना प्रवक्तेपदावर समाधान मानावे लागणार आहे. पण चिंचवडमध्ये मात्र भाजपाने जगताप यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवण्यात आला आहे.
भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीकडून कोणते उमेदवार रिंगणात उतरतात, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. कारण महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील हा तिढा सुटणार का, याकडे लक्ष लागले आहे.तर मनसेही निवडणूकीत उतरणार आहे.