Latest Marathi News
Ganesh J GIF

बजरंग बलीच्या आड लपून भाजपला ४० टक्के कमीशनचे पाप झाकता येणार नाही

आम्हीही बजरंगबलीचे भक्त पण धर्माच्या नावावर राजकीय पोळी भाजत नाही, काँग्रेस आक्रमक

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेचे मोठे समर्थन मिळत असून काँग्रेस पक्ष सत्तेत येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा सैरभैर झाला असून पराभव दिसत असल्याने ते आता धर्माच्या नावावर जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. कधी रामाच्या नावावर तर कधी बजरंग बलीच्या नावावर ते मतं मागत आहेत परंतु देव आणि देवाच्या नावावर समाजामध्ये तेढ निर्माण करणा-या संघटना यातील फरक पंतप्रधानांना कळत नाही हे देशाचे दुर्भाग्य असल्याचे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, बजरंगबलीचे भक्त आम्हीही आहोत, त्याची उपासनाही करतो पण त्याचा सार्वजनिक दिखावा करत नाही. धर्माच्या नावाने जनतेला लुटणाऱ्या संघटना नसाव्यात परंतु काही लोक धर्माच्या नावाने लुटत आहेत. देवाच्या नावाने लुटपाट करणारी व्यवस्था कोणत्याही धर्मात असेल तर त्या व्यवस्थेत बदल झाला पाहिजे तरच लोकांचा धर्मावरचा विश्वास वाढेल. भाजपाकडे जनतेला सांगण्यासारखे काही नाही म्हणून ते नेहमीप्रमाणे धर्माच्या नावावर फुट पाडून मतं मागण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत परंतु कर्नाटकची जनता भाजपाचा हा कुटील हेतू समजते. बजरंग दलावर बंदी घातल्यास बजरंग बलीचा अपमान होतो हा भाजपाचा आरोप धादांत खोटा आहे. भाजपाला राम, हनुमान किंवा कोणत्याही देवाबद्दल प्रेम नाही, भाजपा देवाचा व धर्माचा फक्त सत्तेसाठी वापर करतो. बजरंग दलाच्यावरुन आरडाओरड करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मनोहर पर्रिकर सरकारनेच गोव्यात श्रीराम सेनेवर बंदी घातली होती, त्यावेळी रामाचा अपमान झाला असे वाटले नाही का? त्यामुळे भाजपासाठी देव हे फक्त मतांचा जोगवा मागण्यासाठीच आहेत त्यांचे हे ढोंग जनतेला माहित आहे, भाजपाच्या या कांगाव्याला कोणी फसणार नाही.

उत्तर कर्नाटक जिल्ह्यातील अंगोला येथील प्रचारादरम्यान भाजपा पदाधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना गणपतीची मूर्ती भेट देत असताना मोदींनी गणपती मूर्ती हाताने बाजूला करत त्या कार्यकर्त्यालाही बाजूला सारून गणपतीचा अपमान केला, त्यावर भाजपा नेते का बोलत नाहीत? एकीकडे गणपतीचा अपमान करायचा व दुसरीकडे बजरंगबलीच्या नावाने गळे काढायचे हे भाजपाचे दुटप्पी धोरण नाही का? गणपतीचा अपमान केल्याबद्दल भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समस्त हिंदूंची जाहीर माफी मागितली पाहिजे.

 

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!