Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजपच महायुतीचा ‘मोठा भाऊ’! १६ पैकी ११ उमेदवारांची घोषणा

महाराष्ट्राच्या राजकारणातून या घडीची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपने तब्बल ११ उमेदवारांची यादी जाहीर करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. या यादीमुळे महायुतीत भाजपच ‘मोठा भाऊ’ असल्याचं आता पुन्हा एकदा सिद्ध झालंय.

या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज तातडीने दिल्लीत गेले होते. तिथे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची जवळपास दोन तास हायव्होल्टेज बैठक पार पडली. ही बैठक संपवून देवेंद्र फडणवीस बाहेर पडल्यानंतर काही वेळातच पक्षाने ही ११ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली.

विधान परिषदेच्या एकूण १६ जागांसाठी महायुतीच्या घटकपक्षांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत होती. मात्र, भाजपकडे असणारे संख्याबळ जास्त असल्याने त्यांनी सर्वाधिक जागांवर आग्रह धरला होता. अखेर १६ पैकी ११ जागा स्वतःकडे ठेवत भाजपने महायुतीमधील आपले वर्चस्व दाखवून दिले आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर-जालना या जागेबाबत असलेला सस्पेन्सही आता संपला असून ही जागा आणि उमेदवार निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपने या यादीत अनेक दिग्गज आणि चकित करणाऱ्या नावांना संधी दिली आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागेसाठी अरुण लखानी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अमरावती येथून प्रवीण पोटे यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे, ज्यांनी यापूर्वीच आपला अर्ज दाखल केला होता.भंडारा-गोंदिया विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अवघ्या २५० मतांनी अटीतटीची लढत देणारे अविनाश ब्राम्हणकर यांना पक्षाने आता विधान परिषदेची मोठी संधी दिली आहे.

सोलापूर येथून भाजपचे आक्रमक नेते राजेंद्र राऊत यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.सांगली-सातारा या जागेवरून धैर्यशील कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.अहिल्यानगर मध्ये सर्वात मोठा धक्का म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातून नुकतेच भाजपात प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे यांना भाजपने थेट विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.

अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात भाजपने खेळलेला हा डाव विरोधकांचे गणित बिघडवणार का? आणि महायुतीतील इतर मित्रपक्ष या ११ जागांच्या वाटपानंतर समाधानी राहणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!