भाजप खासदार अनिल बोंडेंनी वक्त्याला म्हटले ‘मुर्ख आहेस का?
शिव जयंतीला आयोजित व्याख्यानात काय घडले, वादाचा व्हिडिओ व्हायरल
अमरावती दि २१(प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. पण अमरावतीत शिव जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपा खासदार अनिल बोंडे आणि शिवव्याखाते तुषार उमाळे यांच्यात वाद झाला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
घडलेला घटनाक्रम असा की, अमरावतीत शिवटेकडी परिसरात शिवजयंती उत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक तुषार उमाळे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. तर त्या कार्यक्रमाला अनिल बोंडे देखील उपस्थित होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज हिंदू की हिंदूत्ववादी?’ हा व्याख्यानाचा विषय होता. यावेळी उमाळे यांनी शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी नव्हते, असे म्हणत उदाहरणे सांगण्यास सुरूवात केली. यावेळी बिंडरनिट्झ उमाळेंना रोखत ‘मुर्ख आहेस का, काहीही बोलू नको’, असे सुनावले. त्यावर उमाळे यांनीही ‘तुम्ही मूर्ख आहात का’ म्हणत प्रत्युत्तर दिले. यावेळी दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. त्यामुळे चिडलेले बोंडें कार्यक्रमातुन जायला निघाले. त्यावेळी उमाळे यांनी “राज्यघटनेने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. त्याची गळचेपी अजिबात सहन केली जाणार नाही. आपण वडीलधारे आहात, आम्ही आपला सन्मान करतो, पण एकेरी भाषेत बोलून भाषणात अडथळे आणणे योग्य नाही. तुम्ही आमच्या स्वातंत्र्यावर बंधने आणू शकत नाही. ज्यांना आपले भाषण ऐकायचे नाही, ते खुशाल सभेतून जाऊ शकतात.’ असे सुनावत आपले भाषण चालू ठेवले. पण त्यानंतर बोंडे यांनी शांतपणे भाषण एैकुन घेत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
तुषार उमाळे यांनी नंतर आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज हे कशा प्रकारे अठरापगड जाती-जमातीच्या लोकांचा सन्मान करीत होते, याची उदाहरणे दिली. त्यानंतर बोंडे यांनीही भाषण केले, पण कार्यक्रमातील श्रोत्यांचा नूर पाहून त्यांनी शांत राहणेच पसंद केले.