पुणे जिल्ह्याच्या विभाजनावरुन भाजप राष्ट्रवादी आमनेसामने
विकासासाठी वेगळा जिल्ह्याची भाजपाची भूमिका, राजकीय मागणीचा राष्ट्रवादीला संशय?
पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील आकुर्डी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. यावरून आता राजकारणाला सुरुवात झाली आहे.
आमदार महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच विभाजन केलेल्या जिल्ह्याला शिवनेरी असे नाव देण्याचीही मागणी यावेळी केली आहे. यावर आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे जिल्ह्याची विभागणी करून, शिवनेरी जिल्ह्याची निर्मिती करून सर्व सामान्यांच्या जीवनमानावावर काही फरक पडणार आहे का? की ही केवळ राजकीय मागणी आहे? असा प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यासाठी खर्ची जाणारा निधी विकासासाठी वापरला जावा. शिवनेरी नावाला विरोध नाही फक्त मागणीमागची व्यवहार्यता तपासायला हवी, असेही कोल्हे म्हणाले आहेत. एकंदरीत कोल्हे यांनी वेगळ्या जिल्ह्याच्या मागणीला विरोध दर्शवला आहे. शिवनेरी नावाला आमचा विरोध नाही. मात्र शिवरायांनी केलं काम या सगळ्यांनी पहिलं पाहिजे. शिवरायाचं तत्व हे लोककल्याणकारी राज्य बसवण्याचे होते असे म्हणत वेगळ्या जिल्ह्यापेक्षा विकास कामांवर जोर द्यायला हवा असे सुचक विधान कोल्हेंनी केले आहे.
पुणे जिल्ह्याचं विभाजन करुन त्यात पिंपरी चिंचवड घेऊन त्या जिल्ह्याला शिवनेरी नाव दिलं तर आम्हाला सर्वांना अभिमान वाटेल. त्यासाठी आपण प्रयत्न केले तर आम्हालाही बरं वाटेल असे मत महेश लांडगे यांनी व्यक्त केले होते.