Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रेमसंबंधांत अडथळा ठरणाऱ्या पित्याचा खून ,असा झाला गुन्हा उघड

पुणे: शिक्रापूर परिसरात संपूर्ण जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले असून प्रेमसंबंधास विरोध केल्याने एका महिलेने अल्पवयीन मुलगी आणि तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलीसह तीनजणांना पोलिसांनी अटक केली आहे

या प्रकरणी अग्नेल जॉय कसबे (वय २३, रा. साईकृपा सोसायटी वडगाव शेरी ), सॅन्ड्रा जॉन्सन लोबो (वय ४३, गुड विल वृंदावन सोसायटी, वडगाव शेरी) आणि एका अल्पवयीन मुलीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. जॉन्सन कॅजिटन लोबो (वय ४५, रा. वडगाव शेरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. आरोपींना तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

नेमकं काय घडलं?

अग्नेल याचे आरोपी सॅन्ड्रा हिच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. तिचे वडील जॉन्सन याचा प्रेमसंबधाला विरोध होता. या कारणावरुन त्यांच्यात वादावादी व्हायची. भांडणाला वैतागून आरोपी महिला आणि तिच्या मुलीने जॉन्सन यांचा खून करण्याचा कट रचला. त्यासाठी त्यांनी समाजमाध्यमातील वेगवेगळ्या गुन्हेगारी विषयक मालिका पाहिल्या. त्यानंतर ३० मे रोजी मध्यरात्री जॉन्सन घरात गाढ झोप होते. आरोपींनी त्यांच्या डोक्यात वरवंटा घातला, तसेच त्यांच्या मानेवर चाकूने वार करून निर्घृण खून केला. त्यानंतर एक दिवस त्यांनी त्याचा मृतदेह घरातच ठेवला. दुसऱ्या दिवशी मृतदेह मोटारीतून नगर रस्त्यावरील सणसवाडी परिसरात मोकळ्या मैदानात पेट्रोल टाकून जाळून टाकला होता.

जॉन्सन यांची पत्नी आरोपी सॅन्ड्रा हिने खून झाल्याचे कोणाच्या लक्षात येऊ नये यासाठी जाॅन्सनचा मोबाइल संच सुरू ठेवला होता. ती दररोज पतीचे समाजमाध्यमातील स्टेटसही बदलायची. तिचा रविवारी (४ जून) वाढदिवस होता. तिने पतीच्या मोबाइल संचावर स्वतःच्या वाढदिवसाचे स्टेटस ठेवले. नातेवाईकांच्या आणि शेजाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार येऊ नये म्हणून तिने ही युक्ती वापरली हाेती. पोलिसांनीही कोणताही पुरावा मागे नसताना अतिशय कौशल्यपूर्ण तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या. सणसवाडी परिसरात गुरुवारी (१ जून) जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. तेव्हा एक मोटार संशयास्पदरित्या दिसून आली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने २३० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासून मोटारीचा शोध घेतला. घटनेच्या दिवशी मोटार आरोपी अग्नेल चालवत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर खुनाला वाचा फुटली.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी, स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, महादेव शेलार, नितीन अतकरे, जितेंद्र पानसरे जनार्दन शेळके, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, किशोर शिवणकर, चंद्रकांत काळे, सचिन होळकर आदींनी ही कारवाई केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!