भाजपाचे हे सात आमदार लढणार लोकसभेची निवडणूक?
लोकसभेचा मतदारसंघही ठरला, अनेक खासदारांचा पत्ता कट होणार, मित्रपक्षाच्या जागेवरही भाजपाचा दावा?
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तयारीला सुरूवात केली आहे. लोकसभानिहाय मतदारसंघात बैठका, मेळावे आणि आढावा भाजपाकडून घेण्यात येत आहे. यंदा ४५ जागा जिंकण्याचा चंगच भाजपाने निश्चित केला आहे. त्यामुळे भाजपा यंदा आमदार असलेल्या काही दिग्गज नेत्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठे उलटफेर होण्याची शक्यता आहे.
भाजपाने विजयाची हॅट्रिक करण्याचा इरादा केला आहे. पण विरोधकांनी एकत्र येत उभा केलेल्या इंडियाचा सामना भाजपाला करावा लागणार आहे. त्यामुळे भाजपाने काळजीपूर्वक नियोजन सुरु केले आहे. भाजपा आगामी लोकसभा निवडणुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेऊन लढणार आहे. त्यातच भाजपाने लोकसभेत सहज विजयी होतील अशा सात आमदारांना लोकसभेची उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याची चर्चा आहे. पण त्यामुळे भाजपाचे कोणते विद्यमान खासदाराचा पत्ता कट होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. आता भाजपाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून लोकसभा तिकीट मिळण्याची शक्यता आहे. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी मिळू शकते. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना रावेरमधून उमेदवारी मिळू शकते. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना सिंधूदुर्ग किंवा इतर ठिकाणाहून लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. ठाण्याचे आमदार संजय केळकर हे ठाण्यातून लोकसभा लढण्याची शक्यता आहे. आमदार राम सातपुते यांना सोलापूर मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अर्थात बीडच्या जागेसाठीही त्यांचा विचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंकजा मुंडेनंतर प्रीतम मुंडे यांनाही भाजपाकडुन साइडलाईन करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. आमदार आकाश फुंडकर यांना अकोला किंवा बुलडाणा येथून संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणाची राजकीय समीकरणे बदलणार आहेत. पण यातील काही जागांवर मित्रपक्ष दावा करण्याची शक्यता असल्याने वेगळे चित्र निर्माण होण्याची शक्यता देखील आहे.
आगामी २०२४ साली ४८ पैकी ४५ हून अधिक जागा जिंकण्याची रणनीती भाजपाकडून आखण्यात आली आहे. मुंबईसह ठाणे आणि राज्याच्या इतर काही मतदारसंघात भाजपा नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतो. पण मध्यप्रदेशच्या विरुद्ध भूमिका महाराष्ट्रात का घेतली जात आहे. याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.