भाकरी फिरली, भाजपाने आपले प्रदेशाध्यक्ष बदलले
लोकसभा निवडणूकीची तयारी सुरु, सुमार कामगिरीमुळे प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी, यांना जबाबदारी
दिल्ली दि ४(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणूकीची तयारी भाजपाने सुरु केली आहे. त्याचीच तयारी म्हणून पक्षाने प्रदेशाध्यक्ष बदलले आहेत. त्यामुळे आता भाकरी फिरवत भाजपाने विरोधकांना आव्हान दिले आहे. पण प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे कारण अस्पष्ट आहे.
भाजपमध्ये राज्यनिहाय नेतृत्वात आज मोठा फेरबदल करण्यात आला. तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड आणि पंजाबचे भाजप प्रदेशाध्यक्षपदी नवीन नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील वर्षाच्या मध्यात होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने संघटनात्मक बदलांना सुरुवात केली असून चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष पक्षाने बदलले आहेत. फेरबदलामध्ये जी. किशन रेड्डी यांची तेलंगणाच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर डी. पुरंदेश्वरी यांची आंध्र प्रदेश भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांना झारखंड आणि सुनील जाखड यांना पंजाबचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे. याशिवाय तेलंगणा भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी एटाला राजेंद्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी ६, ७ आणि ८ जुलै रोजी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि सर्व आघाड्यांचे अध्यक्ष प्रादेशिक नेत्यांच्या बैठका घेणार आहेत. दरम्यान २८ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जेपी नड्डा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत नड्डा यांच्या उपस्थितीने राज्य पातळीवरून सरकार आणि भाजप संघटनेतील बदलांवर चर्चा झाली होती.
येत्या नोव्हेंबरमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम या पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता तिथे भाजप केंद्रीय मंत्र्यांना निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपा आक्रमकपणे तयारीला लागली आहे.