Latest Marathi News
Ganesh J GIF

काँग्रेसच्या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा निर्णय?

महाविकास आघाडी भाजपाविरोधात सक्षमपणे व एकजुटीने लढा देईल, बैठकीत याविषयी चर्चा

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात एक असंवैधानिक सरकार सत्तेवर असून अपात्रतेच्या मुद्द्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन कमळचा हा प्रकार जनतेला आवडलेला नाही. कर्नाटकच्या जनतेने भाजपाला घरी बसवले आहे. महाराष्ट्रात आधी उद्धव ठाकरे यांना व आता शरद पवार यांना काही आमदार सोडून गेले आहेत परंतु या दोन्हीही नेत्यांच्या मागे आजही मोठे जनसमर्थन आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत व भाजपाविरोधात एकजुटीने व सक्षमपणे यशस्वी लढा देऊ, असे कर्नाटकचे मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी स्पष्ट केले.

विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधान भवनातील कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या सर्व विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीलाच दिवंगत खा. सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांना आदरांजली वाहण्यात आली. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना एच. के. पाटील म्हणाले की, देशात मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांची एक मोठी आघाडी होत आहे. विरोधकांची वाढती ताकद पाहून भारतीय जनता पक्ष बिथरला असून नैराश्येतून पक्ष फोडण्याचे काम भाजपा करत आहे. या पक्षफोडीसाठी ईडी, सीबीआय अशा तंत्रांचा वापर केला जात आहे. महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण सुरु असताना काँग्रेस पक्ष एकजूट व मजबूतपणे उभा असून पक्षनिष्ठा काय असते हे त्यांनी या एकजूटीतून दाखवून दिले आहे. या बैठकीला ३९ आमदार उपस्थित होते, जे आमदार या बैठकीला उपस्थित नव्हते त्यांनी आम्हाला त्याची सुचना आधीच दिली होती. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात एकजूट असून मल्लिकार्जून खर्गे, सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या मार्गदर्शानाखाली काम करत आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष एक मोठी ताकद म्हणून राज्यात उभी राहिल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना एच. के. पाटील म्हणाले की, या बैठकीत विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा झाली नाही. योग्यवेळी विरोधी पक्षनेते पदासंदर्भात सर्व घटकांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल. बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या बैठकीत राज्यातील सद्य राजकीय परिस्थीतीवर चर्चा करण्यात आली, सर्वांनी मते मांडली. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस पक्ष म्हणून पुढची रणनिती काय असावी यावरही चर्चा झाली. महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसंदर्भात एच. के. पाटील यांनी मार्गदर्शन केले. महाविकास आघाडी म्हणून भाजपाविरोधात लढण्यावर चर्चा झाली. काँग्रेस पक्ष आगामी पावसाळी अधिवेशनातही सरकारविरोधात जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहिल.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, भाजपा जनतेचे मुळ विषयापासून दुसरीकडे लक्ष हटवण्यासाठी इतर मुद्द्यांना चर्चेत आणत असते. पण काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न हाती घेऊन सरकारला जाब विचारेल व भाजपाचा खरा चेहरा उघडा करेल. महाराष्ट्रात जे राजकीय नाट्य सुरु आहे ते मोदी-शहा दिल्लीतून जी स्क्रिप्ट लिहून देतात त्याप्रमाणे होत आहे. काही लोकांना ईडी सीबीआयची भिती दाखवली जात आहे. भाजपाचे नाही ऐकले तर जेलमध्ये जावे लागेल या भितीतून हे सर्व सुरु आहे. महाराष्ट्रात जे राजकारण सध्या सुरु आहे ते दुःखद आहे. भूषणावह नाही. शाहु, फुले, आंबडेकरांच्या महाराष्ट्रात अशा पद्धतीचे घाणेरडे राजकारण होत आहे हे जनतेला पटलेले नाही.

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काँग्रेस लक्ष ठेवून आहे आज आमची वेट अँड वॉच ची भूमिका आहे. विरोधी पक्ष नेतेपदाबाबत ज्या पक्षांची सदस्य संख्या जास्त त्याच पक्षाचा विरोधी पक्ष नेता होतो. खासदार शरद पवार यांनी यासंदर्भात भूमिका जाहीर केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्या दोन स्वतंत्र बैठका होत आहेत, त्यानंतर उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी चर्चा करुन पुढील रणनिती ठरविली जाईल.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!