Latest Marathi News
Ganesh J GIF

बीआरएस भाजपची ‘बी’ टीम, महाराष्ट्रात परिणाम होणार नाही

पंढरीची वारी आस्थेचा, श्रद्धेचा विषय; केसीआरनी राजकीय फायदा उठवू नये, काँग्रेसचा हल्लाबोल

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- तेलंगणातील भारत राष्ट्र समिती ही भाजपची बी टीम असून महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही. मतविभाजनामुळे कोणाला फायदा होतो हे राज्यातील जनतेला माहित आहे. तेलंगाणात बीआरएस पक्षाला मोठे खिंडार पडले असून त्यांचे अनेक नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. तेलंगणा पॅटर्न हा गुजरात पॅटर्नसारखाच फसवा आहे. तेलंगणात केसीआर यांच्या पक्षाने काय केले याची सर्व माहिती काँग्रेसकडे आहे लवकर या फसव्या तेलंगणा पॅटर्नची पोलखोल करु, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, तेलंगणातील भारत राष्ट्र समिती महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. महाराष्ट्रात काँग्रेस विचाराचेच सरकार यावे ही वारकरी व जनतेची अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल. केसीआर यांनी ९ वर्षात तेलंगणात कोणतेही काम केलेले नाही. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मागासवर्गीयांसाठी त्यांनी ठोस असे काहीही केलेले नाही. आताही कांद्याला तेलंगणात जास्त भाव असल्याचे सांगितले जात होते पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तेलंगणात कांदा विक्रीस नेला असता त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. केसीआर सरकार फक्त मोठ-मोठ्या जाहीराती देऊन काम केल्याचा डांगोरा पिटत आहे. जो काम करतो त्याला जाहीरातबाजी करण्याची आवश्यकता भासत नाही. पंढरपूरमध्ये आषाढीवारी होत आहे. या वारीत हैदराबादहून तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर ६०० गाड्यांचा ताफा घेऊन येत असल्याची माहिती समजते. पंढरपुरात आषाढी वारीला १० लाख वारकरी जमतात, त्यात केसीआर यांनी बाहेरुन आणखी लोक आणून गर्दी करायची हे बरोबर आहे का? पंढरपूरचा विठोबा हा श्रद्धेचा, आस्थेचा विषय आहे, त्याचा कोणी राजकीय फायदा उठवत असेल तर योग्य नाही, असे पटोले म्हणाले.

राज्यातील शिंदे -फडणीस सरकार हे घोषणाबाज व जाहीरातबाज सरकार आहे. काम काहीच करत नाही फक्त गाजावाजा करत असतात. पहिल्याच पावसाने या सरकारच्या दाव्यांची पोलखोल केली. मुंबईत जागोजागी पाणी साचून मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले, ६ मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला. मुंबईत जागोजागी खड्डे खणून ठेवले आहेत. नालेसफाईसह मुंबईच्या कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले पण मुंबई पाण्यात गेलीच, मग खर्च केलेला पैसा गेला कुठे? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!