अतिक्रमण कारवाई करताना पालिका अधिकाऱ्यांची दादागिरी
उपायुक्तांच्या त्या कृतीने नागरिक संतप्त, उद्धटपणाचा व्हिडीओ व्हायरल, आयुक्तांकडे दाद
पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुण्यात प्रशासक राज आल्यापासून महापालिकेने अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई सुरु केली आहे. पण आता आयुक्तांनी ही कारवाई करताना आवक करणारी कृती केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे चर्चेला तोंड फुटले आहे.
उपायुक्त माधव जगताप यांनी फर्ग्युसन रस्त्यावरील व्यावसायिकांवर अतिक्रमण कारवाई केली. यावेळी त्यांनी सगळे स्टॅाल लाथेने उडवून लावले आहे. त्यामुळे स्टाॅल धारकांनी पालिका आयुक्तांकडे दाद मागितली आहे. तसेच जगताप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर ‘फर्ग्युसन रस्त्यावरील बेकायदा व्यावसायिकांच्या विरोधात तक्रारी आलेल्या आहेत. रस्त्यावरील काही परवानाधारकांनी कारवाई विरोधात न्यायालयात अर्ज करून स्थगिती आणली आहे.हे व्यावसायिक वगळून इतर सर्व व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल. परवानाधारक स्टॉल्सचे योग्य जागी पुनर्वसन केले जाईल. फर्ग्युसन रस्त्यावर बेकायदेशीपणे व्यवसाय केला जात आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे याविरोधात महापालिकेकडे व पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज कारवाई झाली. अशा प्रकारे शहरातील इतर भागातही कारवाई करावी अशी मागणी आहे. असे उत्तर महापालिकेकडून देण्यात आले आहे. पण उपायुक्तांनी केलेल्या वर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाला असुन संतप्त प्रतिक्रिया पुणेकरांकडून व्यक्त होत आहेत.
महापालिकेकडून दोन दिवसापूर्वी पूरग्रस्त वसाहतीत धडक कारवाई केली होती. अनेक वर्षे ही पूरग्रस्त वसाहत तिथे आहे. पुनर्वसनात ही घरे पूरग्रस्तांना देण्यात आली असून घरे अद्यापही त्यांच्या नावावर झालेली नाहीत. वसाहतीतील बांधकामांबाबत महापालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कोणतीही नियमावली नाही. मात्र आयुक्तांच्या मनात आल्याने सुट्टीच्या दिवशीही तातडीने कारवाई करण्यात आली, असा आरोप पूरग्रस्त वसाहतीतील नागरिक करत आहेत.