महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कॅप्टन अमरिंदर सिंग यांची वर्णी?
भगतसिंह कोश्यारी कोणत्याही क्षणी पदमुक्त, भाजपाची स्मार्ट खेळी
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोणत्याही क्षणी राज्यपाल पदावरुन पायउतार होऊ शकतात.मला आयुष्यातील उर्वरित काळ मनन आणि चिंतन करण्यात घालवायचा आहे. त्यामुळे मला राज्यपालपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. तसेच राज्याच्या नवीन राज्यापालाचे नावही जवळपास निश्चित करण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महामानवांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केली होती.त्यांनी केलेल्या वक्तव्यांवर विरोधकांनी त्यांच्याविरोधात आणि भाजपविरोधात रान उठवत, त्यांना राज्यपाल पदावरुन हटवण्याची मागणी केली होती. पण आगामी महापालिका निवडणुकीत हा मुद्दा भाजपासाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता असल्याने कोश्यारी कधीही राज्यपाल पदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोश्यारींच्या जागी पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि माजी काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबच्या राजकारणातील बडे नाव आहे. काँग्रेस पक्षात असताना ते पंजाबचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. पण पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर वाद झाल्याने त्यांनी पंजाब लोक काँग्रेस हा पक्ष स्थापन केला होता. पण त्यांना निवडणुकीत अपयश आल्याने त्यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला. त्यांना राज्यपाल पद देऊन त्यांचे पुर्नवसन करण्यात येणार आहे.