उद्धव ठाकरेंना धक्का देणारे एकनाथ शिंदे लोकप्रियेत ‘या’ क्रमांकावर
देशातील टॉप १० मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर, एकनाथ शिंदे ठाकरेंपेक्षा सरस की फिके
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- शिवसेनेला धक्का देत भाजपाच्या साथीने मुख्यमंत्री बनलेले एकनाथ शिंदे सतत दाै-यावर असतात त्याचबरोबर ते नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न देखील करत असतात पण तरीही त्यांना जनतेच्या मनावर आपली छाप उमटवता आलेली नाही. कारण नुकत्याच देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री कोण याचे सर्वेक्षण करण्यात आले होते त्यात शिंदेची कामगिरी निराशाजनक ठरली आहे.
India Today-C Voter ने केलेल्या ‘मूड ऑफ नेशन’ या सर्वेक्षणात देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री कोण याचे सर्वेक्षण करण्यात आले.यावेळी दहा राज्यांमधील जनरेची राजकीय मते जाणून घेण्यात आली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आठव्या क्रमांकावर आहेत. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून केवळ २.२ टक्केच लोकांनी पसंती दिली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ३९ टक्के लोकांनी पसंती दिली असून ते पहिल्या क्रमांकावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत पायाला भिंगरी असल्याप्रमाणे फिरत असतात. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश, राजकीय-सामाजिक कार्यक्रम आणि महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा या माध्यमातून एकनाथ शिंदे हे सतत लाईमलाईटमध्ये राहत आले आहेत. तरीही त्यांना अजून राज्यातील जनतेते स्वीकारले नसल्याचे चित्र आहे. भाजपाची साथ मिळूनही शिंदे जनतेत अपयशी ठरल्याचे चित्र आहे. तर दुस-या एक सर्वेत मुख्यमंत्री शिंदे पहिल्या दहामध्ये देखील येऊ शकले नाहीत.
कोरोना साथीच्या काळात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामामुळे ते घराघरात पोहोचले होते. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधण्याची त्यांची पद्धत अनेकांना आवडली होती. त्यामुळे ते लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत नेहमी अव्वल असायचे. त्यांच्या कामाचे जागतिक संघटनेकडुनही काैतुक करण्यात आले होते. पण एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंसमोर फिके पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.