मुख्यमंत्र्यांना सीबीआयचे समन्स आल्याने उडाली खळबळ
चाैकशीला हजर राहण्याचे आदेश, सरकारच्या अडचणी वाढणार, बघा प्रकरण
दिल्ली दि १४ (प्रतिनिधी)- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी होणार आहे. दारु घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. येत्या १६ तारखेला अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीला बोलावल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
दिल्लीत उत्पादन शुल्क विभागाच्या नव्या मद्य धोरणामुळे आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नवीन मद्य धोरण प्रकरणात सीबीआयला त्यांची चौकशी करायची असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सध्या तुरुंगात आहेत. आता केजरीवाल यांना सीबीआयने समन्स बजावल्याने हा घोटाळ्यात केजरीवाल अडकणार तर नाही? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया अबकारी धोरण प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीत असताना आता केजरीवालांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ऑक्टोबरमध्ये, दिल्लीच्या जोरबाग स्थित मद्य वितरक इंडोस्पिरिट ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक समीर महेंद्रू यांना या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर ईडीने दिल्ली आणि पंजाबमधील जवळपास तीन डझन ठिकाणी छापे टाकून त्याला अटक केली होती. सीबीआयनेही या आठवड्याच्या सुरुवातीला या प्रकरणात पहिले आरोपपत्र दाखल केले. ईडी आणि सीबीआयने उत्पादन शुल्क धोरणात फेरफार करताना अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. यामुळे दिल्ली सरकार चांगलेच अडचणीत आले आहे.
त्याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले आहे. राज्यातील मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी केजरीवाल यांना २७ एप्रिल रोजी हजर राहण्यासाठी सांगितले आहे. राज्यातील मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याचे पोलिसांच्या तपासादरम्यान, दिसून आले आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी केजरीवाल यांना समन्स बजावले असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.