‘त्या’ मुद्दयावरून खासदार सुप्रिया सुळे रूपाली चाकणकर आमनेसामने
पक्षातील महिला नेत्यांची परस्पर विरोधी विधाने, निर्णय भाजपात वाद मात्र राष्ट्रवादीत
पुणे दि १४(प्रतिनिधी)- विधवा महिलांच्या नावापुढे ‘गंगा भागीरथी’ असा उल्लेख करण्यावरुन राज्यातील राजकारण आणि समाजकारण ढवळून निघाले आहे. याच मुद्द्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विसंवाद असल्याचे समोर आले आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी परस्पर विरोधी वक्तव्ये केली आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात विधवा महिलांच्या नावापुढे गंगा भागीरथी असा उल्लेख करण्यावरुन राजकारण तापले आहे. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांना विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी यापुढे त्यांच्या नावापुढे गंगा भागिरथी असा उल्लेख करावा, असा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना विभागाच्या सचिवांना दिल्या होत्या. या निर्णयावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून मोठी टीका झाली होती. पण राष्ट्रवादीतही दुफळी निर्माण झालीय. ”महाराष्ट्रातील विधवा महिलांना सन्मान मिळवून देण्याकरिता विधवा ऐवजी ‘गंगा भागिरथी’ (गं.भा) हा शब्द वापरण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिल्याबद्दल त्यांचे मनपुर्वक आभार.” असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले होते तर सुप्रिया सुळे यांनी मात्र या निर्णयाला विरोध केला आहे. गंगा भागीरथी असा शब्दप्रयोग करण्याचा राज्य सरकार विचार करत असून हे अतिशय वेदनादायी आहे, असे सांगत तो निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. तसे पत्रही त्यांनी लिहिले आहे. मोठा निर्णय घेत असताना त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था व संघटनांना विश्वासात घेऊन व त्यांच्यासोबत विचार विनिमय करून मंगलप्रभात लोढा आपण निर्णय घेतला पाहिजे.” असं सुप्रिया सुळे यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे. त्यामुळे आता या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोन महिला नेत्या आमनेसामने आल्याचे दिसत आहे.
गंगा भागिरथी या निर्णयावरुन भाजपातही मतभेद असल्याचे समोर आले आहे. गं.भा. म्हणजे गंगा भागीरथी… नवरा गेल्यानंतर गंगेवर जाऊन केशवपन केलेल्या स्त्रीला गं.भा. म्हणायची, लिहायची पद्धत होती. याऐवजी… कोणत्याही सज्ञान स्त्रीला कुमारी, सौभाग्यवती, श्रीमती… असे वेगवेगळे उल्लेख करण्यापेक्षा नुसतं “श्रीमती” म्हणायला काय हरकत आहे, असे वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.