राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार धनंजय मुंडेंना संधी?
जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवणार?, संघटनेत भाकरी फिरणार?
मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. पण त्याचवेळी पक्षात मोठे फेरबदल करण्याचे संकेतही दिले आहेत. त्यामुळे लवकरच जयंत पाटील यांच्याएैवजी नवीन प्रदेशाध्यक्ष नेमला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अनेक संघटनात्मक बदल करण्यात येतील असे पवार यांनी स्पष्ट केल्यामुळे लवकरच राष्ट्रवादी नव्या संघटनेसह मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत संघटनात्मक बदल करणार असून नवीन पिढीतील कार्यकर्त्यांना संधी देऊन नवे नेतृत्व घडविणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सध्याच्या पदावरून बढती देऊन त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष पदावर जवळपास पाच वर्षापासून आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष नेमला जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार शशिकांत शिंदे या तीन प्रमुख नावाची चर्चा आहे. शशिकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा पाच वर्षांपूर्वी जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष झाले त्यावेळीही होती. पण काही कारणाने त्यावेळी हे नाव मागे पडले होते. जयंत पाटील यांना बढती देऊन अजित पवार गटाचा प्रदेशाध्यक्ष नेमला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच धनंजय मुंडे यांचा विचार होण्याची शक्यता जास्त आहे. धनंजय मुंडे हे तरुण नेतृत्व आणि धडाडणारी तोफ म्हणून राष्ट्रवादीच्या संघटनेत महत्त्वाचे नाव आहे. येत्या काळात राज्यात महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. येत्या वर्षभरात या निवडणुका निश्चितपणे होतील. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकीपुर्वीच पक्षात फेरबदल केले जाणार आहेत.
पुन्हा अध्यक्षपद स्वीकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. पक्षवाढीसाठी अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प करणारे शरद पवार हे पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बदलापासून होण्याची शक्यता आहे.