पुणे दि ११(प्रतिनिधी)- राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक प्रकरणात आत्तापर्यंत तिघाजणांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणी पत्रकार गोविंद वाकडे यांना अटक करण्यात आली आहे. पण या प्रकरणी सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या तिघांवर ३०७ हे कलम लावण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
पोलीसांनी समता सैनिक दल संघटक मनोज भास्कर घरबडे सदस्य धनंजय भाऊसाहेब इचगज आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओव्हाळ यांना अटक करण्यात आली आहे. यांच्यावर ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. याचा सर्वच राजकीय पक्षानी निषेध केला आहे. पण ३०७ कलम नक्की असते काय आणि त्याअंतर्गत कोणती शिक्षा होऊ शकते ही माहिती आपण पाहूया.
जेव्हा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न करतो. आणि तो त्या व्यक्तिला मारण्यात अपयशी ठरतो. त्यामुळे असा गुन्हा करणाऱ्याला कलम ३०७ अंतर्गत शिक्षा देण्याची तरतूद केलेली आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जर एखाद्याने एखाद्या व्यक्तिला मारण्याचा प्रयत्न केला परंतु ज्या व्यक्तीवर हल्ला झाला आहे त्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला नाही तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीवर हल्ला करणाऱ्यावर कलम ३०७ अंतर्गत खटला चालवला जातो. कलम ३०७ मध्ये खुनाच्या प्रयत्नात दोषी आढळलेल्या आरोपीला कठोर शिक्षेची तरतूद आहे. साधारणपणे अशा प्रकरणांमध्ये दोषींना १० वर्षांपर्यंत कारावास आणि दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. हत्येचा खटला चालवलेल्या माणसाला जर गंभीर दुखापत झाली असेल तर त्याच्यावर हल्ला करणाऱ्याला जन्मठेपेपर्यंतची कारावासाची शिक्षा दिली जाते.