गटारी अमावस्येनिमित्त भाजपकडून कोंबडी वाटपाचे आयोजन
पोस्टरची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा, या ठिकाणी मिळणार मोफत कोंबडी, भाजप नेत्यांचा वेगळाच दावा
मुंबई दि १५ (प्रतिनिधी) – आज देव अमावस्या खरेतर आजचा दिवस हिंदु संस्कृतीत महत्वाचा मानला जातो. पण आजचा दिवस बदलत्या संस्कृतीत चक्क गटारी अमावस्या म्हणून साजरा केला जात आहे. तर त्याच गटारीच्या निमित्ताने भाजपाकडून मुंबईमध्ये चक्क कोंबडी वाटप केले जाणार आहे. या कोंबडीवाटप कार्यक्रमाचे पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या पोस्टरची आणि उपक्रमाची जोरदार चर्चा रंगली आहे.
भाजपाच्या कोकण विकास आघाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून हा कार्यक्रम नियोजित स्थळी पार पडणार असल्याचं म्हटलं आहे. या बॅनरवर भाजपाच्या स्थानिक नेत्यांबरोबरच फडणवीस शहा आणि पंतप्रधान मोदींचा देखील फोटो छापण्यात आला आहे. बबन तोडणकर आणि चेतन देवळेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सचिन शिंदे यांचा देखील फोटो याठिकाणी आहे. पण आता भाजपा नेते याचा काही संबंध नसल्याचे सांगत आहेत. काही खोडसाळ प्रवृत्तींनी माझी प्रतिमा खराब करण्यासाठी कोंबडी वाटपासारख्या एका निंदनीय उपक्रमात माझ्या फोटोचा वापर माझ्या परवानगी शिवाय करून तो व्हायरल करण्याचा खोडसाळ प्रयत्न केला आहे. अशा स्वरूपाचा कोणताही कार्यक्रम घेण्यास मी सांगितले नव्हते. तसेच याला माझा कोणताही पाठिंबा किंवा कोणत्याही प्रकारचे सहकार्य नव्हते. मी स्वतःही या प्रकाराची चौकशी करत आहे,” असं सचिन शिंदेंनी म्हटलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
श्रावण महिना सुरू होण्यास दोन दिवसांचा कालावधी उरलेला आहे. त्यामुळं अनेकजण मनसोक्तपणे मटणावर ताव मारत आहेत. त्यामुळं कोंबड्या घेण्यासाठी कार्यक्रमात मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार भाजप कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात येत आहे.