याकूब मेमन कबरीच्या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
कबर याकुब मेमनची पण वाद भाजप महाविकास आघाडीचा
मुंबई दि ९ (प्रतिनिधी) – मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी फाशीची शिक्षा झालेला याकूब मेमन याच्या कबरीचे करोना काळात झालेल्या सुशोभीकरणावरून राज्यात वाद निर्माण झाला आहे. या वादावरुन भाजप विरूद्ध महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप होत आहेत. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कबर सुशोभीकरणावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महापालिकेला सूचना दिल्या आहेत. याकूब हा स्फोटातील आरोपी असून त्याला फाशी दिली आहे. त्याचे उदात्तीकरण महाराष्ट्र खपवून घेऊ शकत नाही. त्यामुळे कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. या मुद्द्यावर भाजप चांगलीच आक्रमक झाली होती. सुशोभीकरणास महाविकास आघाडी सरकारची अलिखित परवानगी होती, असा आरोप करत भाजपने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी, अशी आग्रही मागणी केली होती. त्यावर याकूब मेमनचा मृतदेह दफनविधीसाठी का दिला, असा सवाल करत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर पलटवार केला होता. एैन गणेश उत्सवात राजकीय पक्षांचा शिमगा रंगला होता.
दक्षिण मुंबईतील मरिन लाइन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते. फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली होती. ही जागा ‘बेरियल वक्फ बोर्डा’च्या अख्यत्यारीत येते. यानंतर पोलिसांनी कारवाई केली असून, एलईडी लाईट्स काढून टाकल्या आहेत.