शिंदे गटाच्या आमदाराकडून जाब विचारणाऱ्या नागरिकाला शिवीगाळ
शिंदे गट पुन्हा वादात, शिविगाळ केल्याचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल
बुलढाणा दि २०(प्रतिनिधी)- राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शिंदे गटाचे आमदार सातत्याने वादात सापडत आहेत. वादग्रस्त वक्तव्ये, मारहाण आणि आक्षेपार्ह भाषेमुळे शिंदे गटाचे नेते अडचणीत येताना दिसले आहेत. आता या यादीत आमदार संजय गायकवाड यांची भर पडली आहे. त्यांनी योजनेची चाैकशी करणाऱ्या नागरिकाला शिविगाळ केल्याची आॅडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.
आमदार संजय गायकवाड यांना अनिल गंगतिरे या व्यक्तीने बोदवड परिसर उपसा सिंचन योजना कधी पूर्ण होणार, असा प्रश्न विचारला होता. यावर संजय गायकवाड यांनी बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक झाली आहे. त्यासाठी मी केंद्र आणि राज्य सरकारकडून ११०० कोटींचा निधीही मंजूर करुन घेतला आहे. आता फक्त निविदा निघण्याची प्रक्रिया सुरु आहे. या मार्च महिन्यात योजनेचे काम सुरुही होईल. त्यामुळे तुम्ही आता काहीतरी नौटंकी करुन राजकारण करु नका असे उत्तर दिले. नाैंंटंकी शब्द वापरल्यामुळे तो आमदार गायकवाड यांच्याशी हुज्जत घालू लागला. त्यामुळे संजय गायकवाड यांच्या संतापाचा पारा आणखीनच चढला आणि त्यांनी गंगतीरेला शिवीगाळ केली. याची आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे गायकवाड वादात सापडले आहेत. दरम्यान आपल्या आक्रमक बोलण्यामुळे संजय गायकवाड अनेकदा वादात सापडले आहेत.
तत्पूर्वी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लीप माझीच असल्याचे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. ती व्यक्ती शेतकरी होती की नाही हे सांगता येत नाही. पण जी भाषा तो बोलत होता त्याला उत्तर दिलं आहे. असे सांगत गायकवाड यांनी योजनेचे श्रेय आमच्या सरकारला मिळू नये म्हणून शेतकऱ्याला पुढे करून सरकारला बदनाम करण्याचे काम सुरु आहे, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे.