महाराष्ट्राच्या माजी आरोग्य मंत्र्याच्या कारला अपघात
अपघातात पाठीला आणि मानेला दुखापत, रूग्णालयात दाखल
पालघर दि २०(प्रतिनिधी)- राज्यात राजकारण्यांच्या अपघातात वाढ झाली आहे.राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कारला अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. दीपक सावंत यांच्या कारला डंपरने जोरदार धडक दिली. यात सावंत गंभीर जखमी झाले आहेत.
डॉक्टर दीपक सावंत हे सकाळच्या सुमारास पालघरकडे रवाना झाले. दीपक सावंत यांची कार काशिमिरा परिसरात पोहोचली तेव्हा त्यांच्या कारला डंपरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच दीपक सावंत यांच्या पाठीला आणि मानेलाही दुखापत झाली आहे.दीपक सावंत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील अंधेरी परिसरातील रुग्णालयात दीपक सावंत यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान सावंत हे पालघर येथील आश्रम शाळेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या संदर्भात अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी दीपक सावंत हे पालघरकडे निघाले होते. त्यावेळी हा अपघात झाला.
महाराष्ट्रात नेत्यांच्या गाडीचे अपघात सत्र सुरु असल्याचे चित्र आहे.आमदार योगेश कदम, धनंजय मुंडे, जयकुमार गोरे, बच्चू कडू यांच्याही गाड्यांचे अपघात झाले होते. तर मागील वर्षी कार अपघात जनसुराज्यचे विनायक मेटे यांचा मृत्यू झाला होता.