मुंबई लोकलमध्ये प्रवाशांमध्ये एकमेकाला तुडवत हाणामारी
हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल, रेल्वे पोलीसांकडुन तपास सुरु, बघा व्हिडिओ
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलमध्ये जागा मिळवताना, स्टेशनवर चढ-उतार करताना बऱ्याचदा वादाचे प्रसंग उद्भवतात. यात मोठ्याने आवाज चढवून बोलणं किंवा अंगावर धावून जाण्यापर्यंतचे वाद हे नेहमीचेच असतात. पण आता कर्जत फास्ट लोकलमध्ये दरवाजात उभ्या राहिलेल्या प्रवाशांची स्टेशनवरील प्रवाशांनी जोरदार धुलाई केली आहे.
प्रवाशांमधील वादाची घटना दिवा स्टेशनवर घडली आहे. स्टेशनवर लोकल आल्यानंतर प्रवासी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना दरवाज्यावर उभे राहून दादागीरी करणारी काही मंडळी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होती. अखेर वैतागलेल्या प्रवाशांनी त्या सर्वांना खाली खेचलं आणि बेदम चोप दिला. संपूर्ण गर्दी अक्षरश: त्यांच्यावर तुटून पडली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानतंर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन तपास सुरू केला आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवा रेल्वे स्थानकात ३ नंबर प्लॅटफॉर्मवर ही घटना घडली. सीएसएमटीवरून कर्जतला जाणारी रेल्वे ७.१० वाजता दिवा स्टेशनला पोहोचली. लोकलमध्ये गर्दी होती आणि प्रवाशांना स्टेशनवर उतरायचे होते. पण एका प्रवाशाने दरवाजा अडवून ठेवला होता. तेव्हा दिवा स्टेशनवरील प्रवाशांनी संबंधित व्यक्तीला मागे जाण्यास सांगितलं पण तो तिथेच अडून बसला. यावरून वाद सुरू झाला आणि प्रकरण मारहाणी पर्यंत पोहोचले. पोलीस मारहाण झालेल्या प्रवाशाला शोधत असून त्याची ओळख पटल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
लोकलच्या दारात क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यामुळे एका प्रवाशाला बेदम मारहाण, दिवा स्थानकावरचा व्हिडीओ व्हायरल pic.twitter.com/6l6KInWz46
— sachin (@RamDhumalepatil) April 5, 2023
दरवाज्यावर उभे राहून दादागीरी करणाऱ्या टोळ्यांवर रेल्वे प्रशासनानं कठोर कारवाई करावी अशी मागणी मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवाशांनी केली आहे. कारण अशा प्रवाशांमुळे चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या दोन्ही प्रवाशांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.