
काय सांगता! पुण्यात चक्क हप्त्यावर मिळणार कोकणचा हापूस
पुण्यातील विक्रेत्याकडून विक्री सुरू, अनोख्या सुविधेचा ग्राहकांना लाभ
पुणे दि ५(प्रतिनिधी)- उन्हाळा आला की फळांचा राजा आंबाचे आगमन होते.उन्हाळा आणि आंबा हे समीकरण सातत्याने आपल्याकडे चालू आहे. कारण आंबा न आवडणार माणूस शोधूनही सापडणार नाही.पण गेल्या काही वर्षापासून हापूस आंब्याचा दर सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. पण पुणेकर व्यापाऱ्याने यावर मार्ग काढत एक शक्कल लढवली आहे.
पुण्याच्या सिंहगड रोड परिसरात या आंबा व्यावसायिकाने ईएमआयवर आंबा विकायला सुरुवात केली आहे. गौरव सणस असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे. आजवर आपण टीव्ही, फ्रीज सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू या ईएमआयवर विकत मिळताना पाहिले होते. पण यावेळेस मात्र या दुकानदाराने अनोखी युक्ती लावत चक्क हप्त्यावर आंबा विक्री चालु केली आहे.पुण्यातील सन सिटी रोडवर आनंद नगर परिसरामध्ये हे दुकान आहे. त्यांनी ही अनोखी आॅफर दिल्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.गौरव या बाबत म्हणाला, हापूस आंबा हा महागडा आणि न परवडणारा असतो. अनेक महागड्या गोष्टी नागरिक एका वेळेला पैसे देऊ शकत नसल्याने ईएमआयवर घेत असतात. हीच संकल्पना मी वापरली. देवगड आंब्याचे पेटीचे दर काही हजारात आहे. त्यामुळे हे आंबे देखील ईएमआयवर विकण्याचे मला सुचले. त्यानुसार पेटीएमच्या माध्यमातून ही कल्पना मी प्रत्यक्षात आणली आहे. सध्या नागरिकांनी होम डिलिव्हरी देखील सुरू आहे. त्याला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.
कोकणातील खास नैसर्गिकरीत्या पिकवलेला देवगड हापूस गाैरवकडे मिळतो. हापुस आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. बाजारात सर्वत्र आंबा विक्रीस आला आहे. मात्र, सध्या या आंब्याचे दर हे गगनाला भिडले आहेत. पण अनोख्या ईएमआय सुविधेचा लाभ दोन ग्राहकांनी घेतला आहे.