(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – महावितरणच्या टॉवरच्या तारांची चोरी करताना टॉवरवरुन पडून एका तरुणाचा मृत्यु झाला. ही बाब लपवून ठेवण्यासाठी त्यांच्या दोघा साथीदारांनी त्याचा मृतदेह पाबे घाटात पुरुन ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे व वेल्हे पोलिसांसह रेस्क्यु पथक दुर्गम पाबे घाटात दाखल झाली असून मृतदेहाचा शोध घेतला जात आहे.
बसवराज पुरंत मॅगिनमन (वय २२) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार सिंहगड रोड पोलीस ठाण्यात २३ जुलै रोजी दाखल करण्यात आली होती. त्याचा शोध घेत असताना ही माहिती समोर आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसवराज हा रुपेश अरुण येनपूरे, सौरभ बापू रेणुसे (वय २५) यांच्याबरोबर १३ जुलै रोजी वेल्ह्यातील रांजणे येथे गेला. महावितरणच्या टॉवरची तांब्याची वायर चोरी करण्यासाठी बसवराज हा टॉवरवर चढला होता. एक्सा ब्लेडने वायर कापत असताना तो टॉवरवरुन खाली पडला.
उंचावरुन पडल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. या प्रकाराने त्याचे दोन्ही साथीदार घाबरले. त्यांनी तेथेच डोंगरात खड्डा खणून त्याचा मृतदेह पुरला. याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून जेथे मृतदेह पुरला, त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक गेले आहेत. पाबे घाटात मृतदेहाचा शोध घेतला जात असल्याचे वेल्हा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अप्पासाहेब पडळकर यांनी सांगितले.