(प्रतिनिधी -प्रियंका बनसोडे) – भाचा व त्याची पत्नी यांच्या घटस्फोटाच्या दाव्यात मध्यस्थी करणे एका ज्येष्ठ नागरिकास चांगलेच महागात पडले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना फायटरने मारहाण करुन जखमी केले.
याबाबत नांदेडफाटा येथे राहणार्या एका ५९ वर्षाच्या नागरिकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना वडगाव खुर्द येथील स्नेहल अपार्टमेंटसमोर शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. त्यानुसार पोलिसांनी अजिंक्य राजाभाऊ कदम, तुषार दिलीप पवार, गौरी तुषार पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा व त्यांची पत्नी यांच्या चालू असलेल्या घटस्फोटाचे दाव्याच्या वादात फिर्यादी यांनी मध्यस्थी केली होती. त्या कारणावरुन आरोपी हे शनिवारी रात्री त्यांच्याकडे आले होते. अजिंक्य कदम याने फायटर हाताचे मुठीमध्ये ठेवून फिर्यादी यांच्या गालावर बुक्की मारुन जखमी केले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी त्यांची भावजय व तिचा मुलगा हे फिर्यादी यांना सोडविण्यास आले असताना तुषार पवार याने त्याला हाताने मारहाण केली. गौरी हिने भावजय यांना हाताने मारहाण करुन धक्काबुक्की करुन ढकलून दिले. हवालदार गवळी तपास करीत आहेत.