Latest Marathi News
Ganesh J GIF

मला बोलता येतंय तोपर्यंतच चर्चेला या, नंतर नाटक….

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा, तब्येत खालावली, राज्यभरात मराठा समाज आक्रमक

जालना दि २९(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा मुद्दा आता अधिकच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा वाढताना दिसत आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसेच साखळी उपोषण देखील सुरु करण्यात आले आहे. आता मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे शिंदे सरकारच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नेतृत्वाखाली मराठा आरक्षण मिळेल असा विश्वास व्यक्त केला. यावर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. महाराष्ट्र सरकारला शेवटचं सांगतो, मराठा आरक्षणाचा मुद्दा गांभिर्यानं घ्या, नाहीतर जड जाईल, मला बोलता येत आहे, तोवर सरकारने चर्चेसाठी यावे असे देखील जरांगे म्हणाले आहेत. मला बोलता येतं तोपर्यंत या, आमच्याशी चर्चा करा. तुम्हाला अडवलं जाणार नाही. तुमचं स्वागत करू. तुम्हाला संरक्षण देऊ. पण आज किंवा उद्याच या. त्यानंतर येऊन फायदा नाही. माझी बोलती बंद झाली तर कशाला येता? असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. यावेळी जरांगे पाटील यांनी खुपच निर्वानीचे वक्तव्य केले आहे. मी कुटुंबाचा उरलो नाही. माझ्यासमोर माझं कुटुंब आणू नका. मला भावनिक नात्यात गुंतवू नका. उद्या तुमचं हे पोरगं गेलं तर बिनधास्त कुंकू पुसायचं. रडायचं नाही, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. आता हळूहळू देशातील क्षत्रिय मराठा उठणार आहे. हे थोड्या दिवसात कळेल. थोडं थांबा, असं सूचक विधानही मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. शिंदे समितीचा आणि आमचा काही संबंध नाही. त्यांना एक पुरावा सापडला तरी आरक्षण देता येतं. यापुढे मराठ्यांना वेड्यात काढू नये. तुम्ही समितीला ५० वर्षाची मुदत दिली तरी आम्ही ऐकणार नाही. आमच्या पद्धतीने आंदोलन करणार आहे. ते सुरुच आहे. यायचं असेल तर या नाही तर नका येऊ असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. आरक्षणाबाबत मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालून जो काही योग्य निर्णय असेल तो घेण्याचे प्रयत्न करत आहेत. जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावा, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते.

पहिल्या टप्प्यात २५ ते २८ असे चार दिवसाचं साखळी उपोषण केलं. नंतर २९ ते १ आमरण उपोषण हा दुसरा टप्पा सुरू आहे. सगळं शांततेत सुरू आहे. उपोषणही शांततेत करा. आरक्षण मिळणारच. प्रत्येक टप्प्यात चार विषय आहे. त्यातील दोन विषय सुरू राहील. आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण करा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!