
रोड शो करत काँग्रेस नेत्याने लोकांवर उधळले पैसे
नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल, पैसे लुटण्यासाठी लोकांची धावपळ
बंगळूर दि २९(प्रतिनिधी)- कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच राजकारण तापलेलं आहे. काँग्रेस आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी लोकांवर हजार आणि पाचशेच्या नोटा उधळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी मंगळवारी मंड्या येथील रोड शोमध्ये लोकांवर पैशांचा वर्षाव केला. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये डीके शिवकुमार आणि त्यांचे कार्यकर्ते बसच्या वर उभे राहून रोड शो करत होते. यात रॅलीत सहभागी होणाऱ्या लोकांवर डीके शिवकुमार यांनी हजार आणि पाचशेच्या नोटा उधळण्यास सुरुवात केली. ते एका वाहनावरून लोकांना हस्तांदोलन करत होते. त्याचवेळी त्यांनी नोटा उधळल्या. त्यानंतर पैसे झेलण्यासाठी लोकांची एकच धावपळ उडाली. रॅली संपल्यानंतर डीके शिवकुमार पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले. याआधीही डीके शिवकुमार यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे डीजीपी प्रवीण सूद यांना नालायक म्हटले होते. केंद्रीय निवडणूक आयोग कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा आज करण्याची शक्यता आहे. असे असले तरी काँग्रेसने मात्र आपल्या १२४ उमेदवारांची पहिली यादी आगोदरच जाहीर केली आहे. डीके शिवकुमार हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. त्यातच आता त्यांनी लोकांवर नोटा उधळल्यामुळं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शिवकुमार ढोल-ताशे वाजवणाऱ्या कलाकारांना तो बक्षीस म्हणून पैसे देत होते, असे बोलले जात आहे. मात्र निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे पैसे फेकणे हा वादाचा विषय बनला आहे. कर्नाटक भाजपने हा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान व्हिडिओबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.