
मुंबई दि २९ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे आणि काहीही करत नाही. म्हणूनच हे सर्व घडत आहे. असे ताशेरे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकारवर केले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या हिंदू जन आक्रोश रॅलीप्रकरणी न्यायमूर्ती जोसेफ यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
सुप्रीम कोर्टाने मुस्लीम समाजाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सकल हिंदू समाजाच्या वतीने वकिलाने युक्तिवाद करताना त्यांच्या संघटनेला धार्मिक मिरवणूक काढण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने सांगितले. त्यावर, निषेध व्यक्त करण्याचा किंवा रॅली काढण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, पण अशा रॅलीतून तुम्हाला देशाचा कायदा मोडण्याची परवानगी दिली जाऊ शकते का?, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला आहे.न्यायमूर्ती नागरत्न म्हणाले की, आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत हा प्रश्न आहे. जवाहरलाल नेहरू, वाजपेयी यांच्यासारखे वक्ते आपल्याकडे होऊन गेले. नेहरूजींचे ते मध्यरात्रीचे भाषण बघा, पण आता सगळीकडून अशी आक्षेपार्ह विधाने येत आहेत, असे मत मांडले. बेजबाबदार गोष्टी आणि वक्तव्ये थांबवायची असतील तर सरकारनेच एक कारवाईची प्रक्रिया सुरू करायला हवी. पण राज्याचे सरकार नपुंसक आहे आणि काहीही करत नाही. ते शांत आहे, म्हणूनच हे सर्व काही घडत आहे,” असे म्हणत न्यायमूर्तींनी शिंदे-फडणवीस सरकारला कार्यपद्धतीवरून सुनावले आहे.
यावेळी न्यायमूर्तीनी सॉलिसीटर जनरल यांनाही सुनावले, ते म्हणाले की राज्य सरकार कोणती कारवाई करणार आहात, हे सांगा. पुढील सुनावणी २८ एप्रिलला होणार आहे.