काँग्रेसचे नेते अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार
काँग्रेस पक्षाचे ३४ नेते ३४ जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची करणार पाहणी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा
मुंबई दि २९ (प्रतिनिधी)- अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटाने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने केलेल्या शेती व फळबागांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने नेत्यांवर जबाबदारी सोपवली असून काँग्रेस पक्षाचे ३४ नेते ३४ जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. व त्यांच्याकडून मिळणा-या माहितीच्या आधारे शेतक-यांना मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारकडे पाठपुरावा करणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी
नुकसानग्रस्त पाहणी दौऱ्यासाठी नेत्यांन जिल्हावार जबाबदारी दिली आहे. यानुसार नाशिक जिल्ह्याची जबाबदारी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिली आहे. माजी मुख्यमंत्री व CWC सदस्य अशोक चव्हाण यांच्याकडे नांदेड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे नागपूर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुणे, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांना ठाणे, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील छत्रपती संभाजीनगर जिल्हा, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे लातूर, प्रदेश कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील अहमनगर, माजी मंत्री सुनिल केदार वर्धा, माजी मंत्री यशोमती ठाकूर अकोला, विधान परिषद गटनेते सतेज पाटील सातारा, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम सोलापूर, माजी मंत्री वसंत पुरके चंद्रपूर, माजी मंत्री पद्माकर वळवी धुळे, माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख बुलढाणा, आ. सुभाष धोटे गडचिरोली, आ. संग्राम थोपटे सांगली, प्रदेश उपाध्यक्ष अमर राजूरकर परभणी, आ. अभिजीत वंजारी गोंदिया, माजी मंत्री आ. रणजित कांबळे अमरावती, आ. राजेश राठोड धाराशीव, आ. ऋतुराज पाटील रत्नागिरी, आ. अमित झनक यवतमाळ, आ. धीरज देशमुख बीड, आ. रविंद्र धंगेकर कोल्हापूर, प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील नंदूरबार, माजी खा. हुसेन दलवाई पालघर, सुरेश टावरे रायगड, नाना गावंडे भंडारा, संजय राठोड जळगाव, माजी आ. हुस्नबानो खलिफे सिंधुदुर्ग, माजी आ. विरेंद्र वाशीम, माजी आ. विजय खडसे हिंगोली, माजी आ. नामदेवराव पवार हे जालना जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करून शेतक-यांशी चर्चा करणार आहेत.
राज्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेलं पिक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय. अशात बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्वाचे ८ निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे.