नवे राज्यपाल रमेश बैस कोश्यारींप्रमाणेच वादग्रस्त
सोरेन सरकार विरुद्ध राज्यपाल अनेकवेळा संघर्ष, कशी आहे बैस यांची राज्यपाल कारकीर्द
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात संतापाची भावना निर्माण करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्याजागी आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांचे संबंध कायम ताणलेले राहिले होते. त्यामुळे बैस नेमके कसे आहेत. याबद्दल अनेकांना कुतुहल होते. पण बैस सुद्धा वादग्रस्त ठरले आहेत.

रमेश बैस महाराष्ट्रात येण्यापूर्वी झारखंडचे राज्यपाल राहिले आहेत. पण महाराष्ट्र जसा कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकारचा वाद होता. नेमका तसाच वाद हेमंत सोरेन आणि राज्यपाल यांच्यात राहिलेला आहे. बैस झारखंडचे राज्यपाल म्हणून ७ जुलैला नियुक्त झाले होते.पण त्यांनी कायम राज्य सरकारवर विरोधी पक्षासारखी टिका केली आहे. झारखंडमध्ये संसाधनांची कमतरता नाही, पण सरकारकडे दूरदृष्टीचा अभाव असल्याचा आरोप बैस यांनी केला होता. एका खाण प्रकरणावेळीही सरकार विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण झाला होता. राज्यपालांनी झारखंड सरकारचे २०२२ ला संमत केलेले वित्त विधेयक देखील परत पाठवले होते. तर एकदा झारखंड स्थापना दिनालाही दांडी मारली होती. आता महाराष्ट्रात त्यांची कारकीर्द कशी राहणार हे पहावे लागणार आहे.
रमेश बैस यांनी छत्तीसगडमधील रायपूरचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. रमेश बैस १९७८ मध्ये रायपूर महानगरपालिकेत पहिल्यांदा निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीत रमेश बैस तीनदा विजयी झाले आहेत. यानंतर २०१९ मध्ये त्यांची त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.