या कारणामुळे अजित पवार यांचे बंड फसणार?
राष्ट्रवादीच्या घटनेतील ती गोष्ट अजित पवारांना अडचणीत आणणार, यामुळे वाढणार अजित पवार गटाची अडचण?
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत सत्तेत सामील झाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी एकनाथ शिंदे यांचा कित्ता गिरवत पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. हे करत असताना त्यांना प्रफुल्ल पटेल यांची साथ मिळताना दिसत आहे. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार यांचे बंड फसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अजित पवार यांनी आपल्या समर्थन आमदारांसह बंडखोरी करत भाजपासोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आम्ही म्हणजेच राष्ट्रवादी असे म्हणत पक्षात काही जणांच्या नेमणुका केल्या आहेत. तर काहीजणांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या घडामोडीत प्रफुल्ल पटेल यांची मोठी साथ अजित पवार यांना होत होती. कारण त्यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण आता एक वेगळीच माहिती समोर आली आहे. कार्याध्यक्ष नावाचे पद जरी घोषित झालेलं असले तरी पक्षाच्या घटनेत मात्र अद्याप त्यांची नोंद झालेली नाही. त्यामुळे हे पद बिनकामाचे ठरणार आहे. त्यामुळे पटेल यांनी केलेल्या नियुक्तीला कुठलाही कायदेशीर आधार राहिलेला नाही. प्रफुल्ल पटेल हे याआधी पक्षाचे उपाध्यक्ष होते. त्या अधिकारात ही निवड केली असेल तरीही त्याला अध्यक्षाची परवानगी गरजेची आहे. त्यातच अजित पवार यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच असतील असे घोषित केले आहे. त्यामुळे अजित पवार गटाची कोंडी होण्याची शक्यता जास्त आहे. सध्या दोन्ही बाजूंनी नियुक्त्या, प्रतिनियुक्त्या केल्या जात आहेत. आपापले गटनेते, व्हीप नेमले जात आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही लढाई पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात येणार आहे. त्यामुळे अजित पवार यांचे बंड फसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या घटनेत जर कुठला घटनाबदल, घटनादुरुस्ती करायची असेल तर तो पक्षाच्या नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये म्हणजे राष्ट्रीय शिबिरातच करता येतो. त्यातही दोन तृतीयांश सदस्यांच्या बहुमतानेच हा बदल मंजूर होऊ शकतो. अशा प्रकारची तरतूद केली गेली आहे.
अजित पवार यांनी अधिकृत गट म्हणून मान्याता मिळवण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजे ३६ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. सध्या अजित पवार यांना २५ आमदारांचा पाठिंबा मिळालेला आहे तर जवळपास १५ ते २० आमदारांनी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. जर अजित पवार यांनी ३६ चा आकडा गाठण्यात अपयश आल्यास अजित पवार यांचे बंड थंड होत फसण्याची शक्यता जास्त आहे.