
नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणावर आधारित आगामी ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ (Maharashtra Epstein Files) या चित्रपटामुळे सध्या सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले असून, आता या चित्रपटाभोवती वादाचे मोहोळ निर्माण झाले आहे. या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayyed) यांनी आपल्याला सतत धमकीचे फोन येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हा खळबळजनक खुलासा केला.

“परिणाम वाईट होतील”, राजकीय नेत्यांकडून धमक्यांचा दावा!

दिपाली सय्यद यांनी सांगितले की, “हा चित्रपट करू नकोस, नाहीतर परिणाम वाईट होतील,” अशा आशयाचे धमक्यांचे फोन त्यांना सतत येत आहेत. विशेष म्हणजे, हे फोन केवळ अज्ञात व्यक्तींकडून नसून, काही बड्या राजकीय व्यक्ती आणि राजकीय महिला नेत्यांकडून आल्याचा धक्कादायक दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे या चित्रपटाला आता केवळ वैचारिक विरोध नसून या प्रकरणाला थेट राजकीय रंग चढल्याचे स्पष्ट झाले आहे.

रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार?
या चित्रपटात दिपाली सय्यद या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर आधारित भूमिका साकारत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर जोरात आहे. मात्र, या भूमिकेबाबत थेट आणि स्पष्ट भाष्य करण्याचे दिपाली सय्यद यांनी सध्यातरी टाळले आहे.
दिपाली सय्यद यांचे वक्तव्य
“मी गेल्या काही महिन्यांपासून ‘बिग बॉस’च्या घरात असल्यामुळे बाहेर काय सुरू आहे, याची मला पूर्ण कल्पना नव्हती. मात्र, घरातून बाहेर आल्यानंतर जेव्हा मी या चित्रपटाची पटकथा वाचली, तेव्हा मला या प्रकरणाची गंभीरता लक्षात आली. जनतेसमोर याचे सत्य येणे अत्यंत गरजेचे आहे आणि मी ते आणणारच.”
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार
या धमकीच्या सत्राची गंभीर दखल घेत दिपाली सय्यद यांनी आता थेट राजकीय पातळीवर पावले उचलण्याचे ठरवले आहे. या प्रकरणासंदर्भात त्या लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार आहेत. आपल्याला फोन करून धमकावणाऱ्यांची नावे त्या वरिष्ठांसमोर मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘आता सर्व काही उघड होईल’; २ ऑक्टोबरला रिलीज!
दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत यांनी नाशिकच्या गाजलेल्या अशोक खरात प्रकरणावर हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटाची “आता सर्व काही उघड होईल” ही टॅगलाइन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार असून, २ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक धक्कादायक गोष्टी आणि मोठी नावे समोर येतील, असा दावा चित्रपट निर्मात्यांकडून केला जात आहे. त्यामुळे येत्या काळात हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

