उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार?
राज्याच्या राजकारणात लवकरच भूकंप, शिंदे गटाच्या अडचणी वाढणार, यामुळेच विस्तार रखडला?
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- शिंदे गटाचा विरोध मोडत अजित पवारांनी राज्याचे अर्थमंत्रीपद मिळवले आहे. त्यातच आता अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. परंतु त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाल्लेकिल्यात अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांनी बॅनर्स लावले आहेत. त्यामुळे अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
अजित पवार भावी मुख्यमंत्री आहेतच आणि ते लवकरच मुख्यमंत्री होतील. असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला सावध केले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत यावर प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले “अजित पवार भावी मुख्यमंत्री आहेतच आणि ते लवकरच मुख्यमंत्री होतील. भावी म्हणजे ते फार दिवश भावी राहणार नाहीत. मलाही राजकारण माहिती आहे. अजित पवार हे भविष्यातले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं हे भविष्य लवकर-लवकर जवळ येत आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्री होतील यात शंका नाही. मी याआधीही सांगितलं की, महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल, अजित पवार यांच्या वाढदिवसाला असे काही बॅनर्स लागलेत की नाही, ते मला माहित नाही, मी काही ते पाहिलं नाही. परंतु ते लवकरच मुख्यमंत्री होतील हे सत्य आहे आणि सत्य आता शिंदे गटाने स्वीकारलं पाहिजे असा टोला देखील राऊतांनी लगावला आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर अजित पवारांनी वाढदिवस साजरा न करता त्याचा सर्व खर्च ईर्शाळवाडी दुर्घटनेसाठी देण्याची सुचना केली आहे. परंतु तरीही काही कार्यकर्त्यांकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. राऊतांच्या या भाकिताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असली तरी राऊतांनी हे विधान शिंदे-फडणवीसांना डिवचण्यासाठी केल्याची चर्चाही आहे. पण राज्यात लवकरच राजकीय भूकंप होणार अशी चर्चा रंगली आहे.
अजित पवार सत्तेत सामील झाले त्यावेळी अजित पवार आॅगस्टमध्ये मुख्यमंत्री होणार असा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला होता. त्यातच अजित पवार अर्थमंत्री तर झाले आहेतच पण महत्वाची खाती देखील त्यांच्या गटाला मिळाली आहेत. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास शिंदे गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे.