पुणे दि ११ (प्रतिनिधी)- राज्याचे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. चंद्रकांत पाटील यांनीही एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांकडे बोट करत ‘बोला तुमच्या पालकमंत्र्यांशी’ असे म्हणत तसे संकेत दिले होते.२०२४ च्या निवडणूका आणि पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीची सत्ता हस्तगत करण्यासाठी फडणवीस पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यातील भाजपचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर या भागात भाजपाची ताकत मोठी आहे. तर ग्रामीण भागात राष्ट्रवादीची ताकत मोठी आहे.जिल्ह्यात २१ पैकी १० आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.तर दोन खासदार आहेत. तर भाजपाचे जिल्ह्यात ९ आमदार आहेत तर एक खासदार आहे. त्यामुळे भाजपाला पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी राष्ट्रवादीशी सामना आहे.
आगामी काळात पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुका, पुणे जिल्हा परिषद, बारामतीसह सर्व नगरपरिषदा आणि सहकारातीलही बऱ्याच निवडणुका होणार आहेत. याच्या निमित्ताने राष्ट्रवादीला आव्हान देण्याच्या दृष्टीने फडणवीसांना पुण्यात पाठवले जाण्याची शक्यता आहे. भाजपने बारामती लोकसभेमध्ये सुप्रिया सुळेंना पराभूत करण्यासाठी कंबर कसली आहे. म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन बारामती दौऱ्यावर येणार आहेत.पण मधल्या काळात कार्यकर्त्यांना ताकत देण्यासाठी फडणवीस मोठी खेळी करु शकतात.
अजित पवार यांचा पुणे जिल्ह्यावर एकहाती अंमल आहे. आपल्या रोखठोक आणि कार्यपद्धतीमुळे ते लोकप्रिय देखील आहेत. चंद्रकात पाटील अजित पवारांना टक्कर देऊ शकत नाहीत. त्यामुळेच फडवणीस यांना पुण्याचे पालकमंत्री पद देऊन अजित पवारांना मात देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चंद्रकांत पाटील यांना सांगली किंवा सोलापूरचे पालकमंत्री पद दिले जाण्याची शक्यता आहे.