मोहसीन शेख हत्या प्रकरणी हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाईंची निर्दोष मुक्तता
देशाला हादरवणारे पुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरण नेमके आहे तरी काय
पुणे दि २७(प्रतिनिधी)- संपूर्ण देशभरात गाजलेल्या पुण्यातील अभियंता मोहसीन शेख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाईसह वीस जणांवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. पण पुणे सत्र न्यायालयाने आज या आरोपातून सगळ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

पुण्यातील हडपसरमध्ये २ जून २०१४ ला दंगल उसळली होती. यात मोहसीन शेखचा मृत्यू झाला होता. मोहसीनचा भाऊ मोबीन मोहंमद सादीक शेखने फिर्याद दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी हिंदू राष्ट्रसेनेचा प्रमुख धनंजयदेसाईसह २० जणांना अटक केली होती. त्यावेळी महापुरुषांबद्दल वादग्रस्त पोस्टर सोशल मीडियावर शेअर झाल्याने धनंजय देसाईंनी भाषण केले होते. त्या भाषणानंतर हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोहसीन शेखला मारहाण केली होती त्यात त्याचा मृत्यू झाला होता. मोहसीन शेख हा मूळचा सोलापूरचा होता. तो मुस्लिम होता एवढ्याच कारणातून त्याची विनाकारण हत्या करण्यात आल्याचा आरोप शेखच्या कुटुंबियांनी केला होता. सोलापूरमधील काही तरुणांनी ‘जस्टिस फॉर मोहसीन’ ही चळवळ देखील सुरू केली होती. पण न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी देसाईंसह इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान २०१९ मध्ये धनंजय देसाईंना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.
छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर टाकल्यामुळे २ जून २०१४ मध्ये हडपसर मध्ये दंगल झाली होती. त्यावेळी हिंदू राष्ट्र सेनेने तोडफोड केली होती. याचवेळी मोहसीनला त्याच्या दाढी आणि पेहरावावरून हटकत मारहाण करण्यात आली होती.