महाविकास आघाडीकडून भाजपा शिंदे गटाला जोराचा झटका
लोकसभा निवडणुका झाल्या तर कोणाची सत्ता, धक्का देणारे सर्वेक्षण एकदा बघाच
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- शिवसेनेत फूट पाडून राज्यात सत्ता स्थापन करणाऱ्या शिंदे-फडणवीसांची चिंता वाढवणारे एक सर्वेक्षण समोर आले आहे.या सर्वेक्षणात महाविकास आघाडी भाजपाला आगामी लोकसभेत धोबीपछाड देईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या मुळे भाजपा आणि शिंदे गटाची चिंता वाढली आहे.
लोकसभेच्या निवडणुका आताच्या परिस्थितीत झाल्या तर कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाची परिस्थिती चांगली असेल? कोणाला किती जागा मिळू शकतात? कोणत्या पक्षांची आघाडी वरचढ ठरेल? याचा मागोवा घेण्यासाठी सी व्होटर व इंडिया टूडेने एक सर्वेक्षण केले आहे. यात महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास भाजपा आणि शिंदे गटाला केवळ १४ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, महाविकास आघाडी तब्बल ३४ जागांवर बाजी मारेल, असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. याचा अर्थ भाजपाला राज्यात मोठ पराभव स्वीकारावा लागणार आहे. आज घडीला भाजप आणि शिंदे गटाचे ३७ खासदार आहेत.पण लोकसभेत तो आकडा १४ वर घसरणार असल्यामुळे महाराष्ट्रातील मतदार शिंदे फडणवीस सरकारवर नाराज दिसत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी दोन अंकी संख्या देखील गाठणार नाही असे वक्तव्य करता आपण विक्रमी जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान मोदींच्या कारभारावर मात्र जनता खुश असल्याचे समोर आले आहे. देशातील ६७% लोकांनी त्यांचे काम योग्य असल्याचे म्हटले आहे.
देशपातळीवरचा विचार करायचा झाल्यास भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्ता राखण्यात यश मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यात एनडीएला २९८ जागा मिळतील तर काँग्रेस प्रणित यूपीए आघाडीला १५३ जागा मिळतील, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. इतर पक्ष १०० जागा जिंकतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशात पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार आहे.